पुणे जिल्ह्यातील पायाभूत सुविधांचा होतोय विकास, हि केलीय शासनाने कामे त्याबद्दल रिपोर्ट

मंगळवार, 4 जुलै 2023 (14:12 IST)
R S
गेल्या वर्षभरात जिल्ह्याच्या विकासाला गती देण्यात आली आहे. विशेषत: पायाभूत सुविधांच्या विकासावर विशेष भर देण्यात येत आहे. रस्ते, मेट्रो मार्ग, नदी सुधार प्रकल्प, शिक्षण, आरोग्य अशा विविध माध्यमातून शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांसाठी चांगल्या सुविधा निर्माण करण्यात येत आहेत.
 
चांदणी चौकातील वाहतूक कोंडी दूर करण्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी स्वत: लक्ष घालून प्रशासनाला सूचना केल्या. त्यानुसार येथील एकात्मिक उड्डाणपूल प्रकल्पाचे काम अंतिम टप्प्यात आहे. जुन्या पुलाच्या ठिकाणी मुंबई ते सातारा किंवा कोथरूडकडे जाण्यासाठी पाच आणि साताराकडून मुंबईकडे जाण्यासाठी तीन अशा आठ मार्गिका आता उपलब्ध असल्याने वाहतूक कोंडी कमी झाली आहे. मुळशी ते कोथरूड रस्त्यावरील भुयारी मार्गाचे रुंदीकरणही करण्यात आले आहे.
 
पुणे शहरातील वाहतूक कोंडी कमी करण्याच्यादृष्टीने पुणे बाह्यवळण मार्गाचे काम, मेट्रो प्रकल्पांना गती देण्यात येत आहे. शहरातील नदी सुधार प्रकल्प, सांडपाणी व्यवस्थापन प्रकल्प, समान पाणीपुरवठा योजना अशा विविध कामे गतीने पूर्ण करण्यासाठी प्रयत्न सुरू असून त्याद्वारे शहराचे रुप पालटणार आहे.
 
मुंबई ते पुणे द्रुतगती महामार्गांतर्गत खोपोली ते खंडाळा या घाट लांबीतील मिसिंग लिंकचे काम अंतिम टप्प्यात आहे. हे काम पूर्ण झाल्यावर प्रवासाचा वेळ अर्ध्या तासाने कमी होणार. या मार्गाच्या बांधकामासाठी ६ हजार ६९५ कोटी रुपयांच्या सुधारित किंमतीस मान्यता देण्याचा निर्णय घेण्यात आला.
 
श्री संत ज्ञानेश्वर महाराज व श्री संत तुकाराम महाराज पालखीमार्गाच्या कामालादेखील गती देण्यात आली आहे. पुणे शहरातील वर्तुळाकार मार्गासाठी भूसंपादन प्रक्रीया सुरू करण्यात आली आहे. हा मार्ग पुण्याच्या विकासातील मैलाचा दगड ठरणार आहे.
 
पुणे जिल्हा परिषदेचा शाळा सुधारचा १२५ कोटीचा आराखडा तयार करण्यात आला असून विविध योजनांच्या समन्वयातून निधी उपलब्ध करण्यात येणार. सामान्य नागरिकांना आरोग्य सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी ११ ठिकाणी ‘बाळासाहेब ठाकरे आपला दवाखाना’ सुरू करण्यात आला आहे.
R S
पालकमंत्री चंद्रकांतदादा पाटील यांच्या प्रयत्नांमुळे पुणे जिल्ह्यात सन २०२३-२४ जिल्हा वार्षिक योजनेअंतर्गत सर्वसाधारण योजनेच्या विकास आराखड्यासाठी गतवर्षापेक्षा १३० कोटींची भरीव वाढ करण्यात आली आहे. जिल्हा वार्षिक योजनेंतर्गत १ हजार ५ कोटी रुपये एवढा नियतव्यय मंजूर करण्यात आला आहे.
 
जिल्ह्यातील शिक्षण, आरोग्य, रस्ते आदी विविध विकासकामांना गती देऊन जिल्ह्याला विकासाच्या मार्गावर पुढे नेण्याचा प्रयत्न होत आहे. जी-२० बैठकांच्या निमित्ताने जागतिक पातळीवर पुण्याची झालेली ओळखही या विकास प्रक्रियेला आणखी पुढे नेणारी अशीच आहे.
 
राज्यशासनाने जिल्ह्यातील पायाभूत सुविधांच्या विकासावर भर दिला आहे. त्याअनुषंगाने जिल्हा प्रशासनानेदेखील जिल्हाधिकारी डॉ.राजेश देशमुख यांच्या मार्गदर्शनाखाली चांगली कामगिरी केली आहे. जिल्ह्यात पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्ग, संत तुकाराम महाराज पालखी मार्ग, चांदणी चौक, महामेट्रो लाईन एक,  दोन व पीएमआरडीए- आयटी सीटी मेट्रो लाईन तीन, पुणे-मिरज नवीन ब्रॉडगेज रेल्वे मार्गाचे १०० टक्के भूसंपादन करण्यात आले. बारामती-लोणंद नवीन रेल्वे मार्गाचे, संत ज्ञानेश्वर महाराज पालखी मार्गाचे भूसंपादनही अंतिम टप्प्यात आहे. पुण्याच्यादृष्टीने महत्वाच्या असलेल्या पुणे (पश्चिम) रिंगरोडच्या फेरमूल्यांकनाची प्रक्रिया पूर्ण करण्यात आली आहे.
 
मुंबई-पुणे यशवंतराव चव्हाण द्रुतगती महामार्गासह समृद्धी महामार्गावर राबवण्यात येत असलेल्या एकात्मिक वाहतूक व्यवस्थापन प्रणालीच्या धर्तीवर येत्या काळात मुंबई- कोल्हापूर, नाशिक- पुणे, अहमदनगर- पुणे या महामार्गावर ही प्रणाली राबवण्यात येणार असून त्यामुळे पुणे शहर आणि जिल्ह्यातील नागरिकांना या महामार्गांवर सुरक्षित प्रवासाची हमी मिळणार आहे आणि विकासालाही गती मिळू शकेल.
 
पुणे शहरात मेट्रोमार्गांचा विकास गतीने सुरू असून पीएमआरडीएमार्फत हिंजवडी ते शिवाजीनगर मेट्रो हा २३.३ कि.मी. च्या प्रकल्पाचे काम प्रगतीत आहे. महामेट्रोमार्फत वनाज ते रामवाडी आणि पिंपरी- चिंचवड ते स्वारगेट मेट्रो प्रकल्पाचे कामही गतीने सुरू आहे. आता पिंपरी- चिंचवड ते निगडी कॉरिडॉर आणि स्वारगेट ते कात्रज मेट्रो प्रकल्प केंद्र शासनाच्या मान्यतेसाठी पाठवले असून मान्यता मिळाल्यानंतर कामे हाती घेण्यात येणार आहेत. ही कामे भविष्यातील पुण्याच्या दळणवळण व्यवस्थेला निश्चितपणे आकार देतील.
 
शासनाचे विकासपूरक धोरण, वेगवान निर्णय आणि त्याला प्रशासनाच्या गतीमान कामगिरीची जोड असल्याने पुणे जिल्ह्यातील विविध प्रकल्पांना गती मिळाली आहे. त्यामुळे येत्या काळात जिल्ह्यातील नागरिकांच्या समस्या दूर होऊन विकासाला चालना मिळणार आहे.
Edited by : Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती