32 वर्षीय मराठी अभिनेत्रीवर अनेकदा बलात्कार, माजी आमदाराच्या मुलावर गंभीर आरोप
सोमवार, 29 जानेवारी 2024 (16:08 IST)
पुण्यातून एक धक्कादायक घटना समोर आली आहे. माजी आमदाराच्या मुलावर मराठी चित्रपटसृष्टीतील अभिनेत्रीवर बलात्काराचा आरोप करण्यात आला आहे. या प्रकरणी सोलापूर येथील रहिवासी असलेल्या आरोपीविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने लग्नाच्या बहाण्याने 32 वर्षीय पीडितेसोबत अनेकवेळा शारीरिक संबंध ठेवले होते. आरोपीने तिच्या डोक्यावर पिस्तुल रोखून धमकावल्याचा आरोपही तक्रारीत करण्यात आला आहे. पोलिसांनी एफआयआर नोंदवून या प्रकरणाचा तपास सुरू केला आहे.
मिळालेल्या माहितीनुसार, विमानतळ पोलीस ठाण्यात 35 वर्षीय विराज रविकांत पाटील याच्याविरुद्ध बलात्कार आणि शस्त्रास्त्र कायद्यांतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 32 वर्षीय अभिनेत्रीने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली होती. आरोपी विराज हा सोलापूरच्या सोरेगाव येथील रॉयल पाममध्ये राहतो.
32 वर्षीय पीडितेने शुक्रवारी विमानतळ पोलिस ठाण्यात तक्रार दाखल केली. तक्रारीनुसार, ही घटना 27 ऑगस्ट 2023 ते 20 जानेवारी 2024 दरम्यान विमाननगर आणि मुळशी येथील एका रिसॉर्टमध्ये घडली. विराज पाटील यांच्याविरुद्ध एफआयआर दाखल करण्यात आला आहे.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, पीडित तरुणी मॉडेलिंग करते. तिने मराठी चित्रपटांमध्ये काम केले आहे. सोशल मीडियाच्या माध्यमातून त्यांची विराज पाटील यांच्याशी ओळख झाली. पहिल्या पत्नीला घटस्फोट दिल्यानंतर विराजने तिच्याशी लग्न करणार असल्याचे अभिनेत्रीला सांगितले होते, असा आरोप आहे. लग्नाचे बोलून तिच्याशी वारंवार शारीरिक संबंध ठेवले.
तक्रारदार महिलेने सांगितले की, जेव्हाही ती लग्नाबद्दल बोलायची तेव्हा विराज हे प्रकरण टाळायचा. नंतर तो महिलेपासून अंतर राखू लागला. दरम्यान तरुणीने त्याच्यावर लग्नासाठी दबाव टाकला असता त्याने तिला पिस्तुलाचा धाक दाखवून शिवीगाळ केली. तसेच पोलिसांकडे न जाण्याचा इशारा दिला.
पोलिसांनी सांगितले की अभिनेत्रीने मे 2023 मध्ये सोशल मीडियावर विराजसोबत चॅटिंग सुरू केले. घटस्फोटाची याचिका प्रलंबित असतानाही विराजने तिला लग्नाचा प्रस्ताव दिल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. पीडितेने सांगितले की, तिचा 2016 मध्ये घटस्फोट झाला असून तिला एक मुलगीही आहे.