म्युकरमायकोसिसवरील उपचारांसंदर्भात पुणे महानगर पालिकेने महत्त्वपूर्ण निर्णय घेतला आहे. पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी यासंदर्भात माहिती दिली आहे. पुण्यात आढळणाऱ्या म्युकरमायकोसिसच्या रुग्णांवर उपचारांसाठी महानगर पालिकेकडून अर्थसहाय्य देण्यात येणार असल्याचं महापौर मुरलीधर मोहोळ यांनी जाहीर केलं आहे.
पुणे शहरात म्युकरमायकोसिस आजाराचे रुग्ण आढळल्यावर त्यांच्यावर उपचार करण्यासाठी पुणे महापालिकेच्या शहरी गरीब योजनेअंतर्गत ३ लाख रुपयांचे अर्थसहाय्य दिले जाणार आहे, अशी माहिती महापौर मुरलीधर मोहोळ यांनी दिली. तसेच या रुग्णांसाठी महापालिकेच्या दळवी रुग्णालयात १५ बेड राखीव ठेवण्यात आले असल्याचे त्यांनी सांगितले.
यावेळी मुरलीधर मोहोळ म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या शहर गरीब योजनेअंतर्गत महापालिका आणि खासगी रुग्णालयामध्ये आजारावर १ लाख रुपयांचे अर्थसहाय्य विविध आजारावर दिले गेले आहे. या योजनेचा हजारो नागरिकांनी लाभ घेतला असून आता विशेष करून म्युकरमायकोसिस आजाराचा समावेश या योजनेत करण्यात आला आहे. तसेच, १ लाखांच्या ऐवजी ३ लाख रुपयांपर्यंत अर्थसहाय्य दिले जाणार असल्याचे त्यांनी सांगितले.
म. फुले योजनेअंतर्गत सुमारे १०० रुग्णालयांत म्युकरमायकोसिसवरील उपचार शक्यमहापौर पुढे म्हणाले की, पुणे महानगरपालिकेच्या शिवाजीनगर येथील दळवी रुग्णालयात १५ बेड राखीव ठेवण्यात आले आहे. तसेच तज्ञ डॉक्टरांची देखील नेमणूक करण्यात आली आहे. त्यामुळे म्युकरमायकोसिस आजाराची कोणतीही लक्षणे आढळल्यास आपल्या जवळील रुग्णालयात जाऊन तातडीने तपासणी करून घ्यावी आणि त्यावर उपचार घ्यावेत, असे आवाहन मोहोळ यांनी यावेळी केले.