केंद्र सरकारने कोरेगाव भीमा प्रकरणाचा तपास अचानक राज्य सरकारकडून काढून घेत एनआयएला दिला. त्यानंतर या प्रकरणाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी पुण्यात आलेल्या एनआयएच्या पथकाला रिकाम्या हातीच माघारी परतावं लागलं आहे. पुणे पोलिसांनी महासंचालकांच्या परवानगीशिवाय कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं एनआयएच्या ताब्यात देण्यास स्पष्ट नकार दिला. दरम्यान, एनआयएचे तीन अधिकारी सकाळी मुंबईहून पुण्यात दाखल झाले होते. त्यांनी दिवसभर या प्रकरणातील कागदत्रपत्रांची पाहणी केली.
एनआयएचं पथक सोमवारी सकाळपासून कोरेगाव भीमा प्रकरणाची कागदपत्रं ताब्यात घेण्यासाठी पुणे आयुक्तालयात ठाण मांडून बसलं होते. इतकंच नाही तर त्यांनी पुणे पोलिसांना या प्रकरणाची कागदपत्रं ताब्यात देण्याची मागणी केली. मात्र, पुणे पोलिसांनी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण केल्याशिवाय कागदपत्रं देण्यास स्पष्ट नकार दिला. त्यामुळे एनआयएला दिवसअखेर रिकाम्या हाती परतावं लागलं.