सिद्धू मुसेवाला हत्या प्रकरणातील संशयित सौरभ महाकाळला पुणे पोलिसांकडून अटक
बुधवार, 8 जून 2022 (18:19 IST)
पंजाबी गायक सिद्धू मुसेवाला यांच्या हत्याप्रकरणात पुण्यातील ज्या युवकाचे नाव समोर आले होते, त्या युवकाला पुणे ग्रामीण पोलिसांनी अटक केली आहे. सौरभ महाकाळ असे या युवकाचे नाव आहे.
ओंकार उर्फ राण्या बानखेले खून प्रकरणातील आरोपी संतोष जाधव याला आश्रय देणारा सौरभ महाकाळ उर्फ सिद्धेश कांबळे याला अटक करण्यात आल्याचे पोलिसांनी सांगितले आहे. पोलिसांच्या प्रसिद्धी पत्रकात सिद्धू मुसेवालाच्या हत्येशी सौरभचा संबंध आहे किंवा नाही याबाबत माहिती देण्यात आलेली नाही.
सौरभ महाकाळ या प्रकरणात संशयित असल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले आहे.
पंजाबच्या मन्सा जिल्ह्यात 29 मे 2022 रोजी सायंकाळी जवाहरके गावात झालेल्या हल्ल्यामध्ये मुसेवालांचा मृत्यू झाला. या प्रकरणात पंजाब पोलिसांनी संशयितांची यादी जाहीर केली होती. यामध्ये पुण्याच्या संतोष जाधव आणि सौरव महाकाळ यांची नावे समोर आली होती.
मुसेवालांवर गोळ्या झाडणाऱ्या आठ जणांपैकी दोघे जण पुण्याचे असल्याचे पंजाब पोलिसांनी म्हटले होते.
संतोष जाधव आणि सौरव महाकाळ हे विविध गुन्ह्यासाठी वाँटेड असल्याची माहिती पुणे ग्रामीण पोलिस अधिक्षक अभिनव देशमुख यांनी दिली होती. पण त्यांनी तेव्हा स्पष्ट केले होते की पुण्यातले हे आरोपी सिद्धू मुसेवालाच्या प्रकरणात सहभागी आहेत की नाही याबाबत आताच सांगता येणार नाही.
"संतोष जाधव हा आमच्यासाठी मर्डर केसमध्ये वाँटेड आहे. तो राजस्थान, पंजाब बार्डवर पळून गेला होता आणि अजूनही फरार आहे, एवढीच माहिती आमच्याकडे आहे,"
"मुसेवाला मर्डर केसमध्ये त्याचा काही रोल आहे का किंवा त्याचा काही रोल निष्पन्न झाला आहे का याच्याविषयी आमच्याकडे कोणतंही ऑफिशियल कम्युनिकेशन नाहीये. त्याची माहिती पंजाब पोलिसच देऊ शकतील. मला वाटतं या तपासाठी त्यांच्याकडे SIT आहे. ते डिटेल सांगू शकतील. आपल्याकडे त्यांनी काही मदत मागितलेली नाही किंवा त्यांची टीमही इथे आलेली नाही", असं देशमुख यांनी सांगितलं होतं.
"तो आपल्याकडे वाँटेड आहे. आम्ही त्याच्या शोधात आहोत. त्याचे फोटो त्यांच्याशी शेअर केले होते. पण त्यांना आम्ही कोणतं सीसीटीव्ही फुटेज व्हेरिफाय करुन दिलेलं नाही. या केसशी संबंधित काही कम्युनिकेशन नाही.
त्याच्या अटकेच्या संबंधित बाकी सगळ्या तपास यंत्रणा (ज्यात पंजाब पोलिसही आले) यांना कळविण्यात आल्याचं पुणे ग्रामीण पोलिसांकडून सांगण्यात आलं आहे. तो 20 जूनपर्यंत पुणे ग्रामीण पोलिसांच्या ताब्यात असेल.
"सौरव महाकाळ हा तळेगाव दाभाडे भागातला वाँटेड आहे. संतोष जाधव हा 302 मोक्का केसमधला वाँटेड आरोपी आहे. तो 7-8 महिन्यांपासून फरार आहे. वाँटेड आरोपीच्या शोधासाठी त्या भागातून आपण माहिती घेतच असतो. पण मुसेवाला केसच्या संदर्भात त्याच्या सहभागाविषयीचं व्हेरिफेकेशन आम्ही केलेलं नाहीये", असं पोलिसांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार मुसेवालांच्या वाहनावर बंदुकीच्या गोळ्यांचे तीस राऊंड फायर करण्यात आले. मुसेवाला सुरक्षा रक्षकांशिवाय घराबाहेर पडले होते.
मुसेवाला यांना गोळीबारानंतर तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं मात्र तिथे त्यांचा मृत्यू झाल्याचं जाहीर करण्यात आलं.
साधारण चार वर्षांपूर्वी पंजाबी करमणूक दुनियेत शुभदीप सिंह सिद्धू अल्पावधीतच सिद्धू मुसेवाला या नावाने प्रसिद्ध झाले.
एकदा एका चॅनलचे अँकर कॉलेज परिसरात विद्यार्थ्यांशी बोलत होते. तेव्हा शुभदीप सिंह सिद्धू मुसेवाला गर्दीतून समोर आले आणि गाण्याची संधी मागितली.
त्यांनी गाणं गायलं आणि सगळ्यांना आवडलं. एक काळ होता जेव्हा सिद्धूंना स्वतःची ओळख सांगावी लागायची आणि एक काळ असा आला जेव्हा ते सिद्धू मुसेवाला या नावाने संपूर्ण राज्यात प्रसिद्ध झाले. ते मानसा जिल्ह्यातल्या मूसा गावाचे राहाणारे होते.
सिद्धू मुसेवालांची लोकप्रियता 2018 साली एकदम वाढली जेव्हा त्यांनी गन कल्चरशी संबंधित अनेक गाणी म्हटली. त्यांच्या गाण्यात बंदुकांचा नेहमीच उल्लेख असायचा.
त्यांची आई चरणजीत कौर मूसा गावाच्या सरपंच आहेत. सरपंच निवडणुकीदरम्यान त्यांनी आपल्या आईसाठी जोमाने प्रचार केला होता.
सिद्ध मुसेवाला यांनी सरदार चेतन सिंह सर्वहितकारी विद्यामंदिर, मानसाहून बारावीपर्यंत शिक्षण घेतलं. यानंतर त्यांनी पदवी घेतली आणि नंतर कॅनडात एका वर्षाचा डिप्लोमाही केला.
मुसेवालांची गाणी आणि चित्रपट
सिद्धू मुसेवालांची अनेक गाणी आणि चित्रपट हिट झाले. युट्यूबवर त्यांच्या 'हाय', 'धक्का', 'ओल्ड स्कूल' आणि 'संजू' सारखी गाणी लाखो वेळा पाहिली गेली.
या गाण्यांच्या माध्यमांतून कथितरित्या बंदूक संस्कृती (गन कल्चर) ला प्रोत्साहन देण्यासाठी मुसेवाला यांच्यावर अनेकदा टीका झाली आणि त्यांच्यावर खटलाही भरला गेला.
गायक म्हणून यशस्वी झाल्यानंतर सिद्धू मुसेवालांनी चित्रपटातही अभिनय केला.
त्यांनी, 'आय अॅम स्टुडंट', 'तेरी मेरी जोडी', 'गुनाह', 'मूसा जट्ट', 'जट्टं दा मुंडा गौन लगा' अशा चित्रपटात काम केलं.
त्यांच्या गाण्यांना बॉलिवूडमध्येही प्रसिद्धी मिळत होती. फिल्मस्टार रणवीर सिंह आणि विकी कौशल यांनीही सिद्धू यांची गाणी सोशल मीडियावर शेअर केली होती.
गुन्हे, खटले आणि वाद
सिद्धू मुसेवाला यांचं नाव वादातही अनेकदा अडकलं. गोळीबार करतानाचे त्यांचे दोन व्हीडिओ व्हायरल झाले होते. यातल्या एका व्हीडिओत ते बर्नालाच्या बडबर फायरिंग रेंजमध्ये कथितरित्या रायफलने गोळीबार करताना दिसतात.
मे 2020 मध्ये संगरूर आणि बर्नालामध्ये सिद्धू आणि आणखी नऊ लोकांवर या प्रकरणी गुन्हा दाखल झाला.
दुसऱ्या व्हीडिओत सिद्धू मुसेवालांच्या संगरूरच्या लड्डा कोठी रेंजमध्ये पिस्तुलाने गोळ्या चालवताना दिसत आहे. दोन्ही व्हीडिओ लॉकडाऊनच्या काळातले आहेत.
पोलिसांनी आधी आपत्ती व्यवस्थापन अधिनियमाअंतर्गत सिद्धू मुसेवालांवर गुन्हे दाखल केले आणि नंतर हे दोन्ही गुन्ह्यांमध्ये आर्म अॅक्टची कलमं जोडली गेली.
याआधी फेब्रुवारी 2020 मध्ये मानसा पोलिसांनी हत्यारांच्या वापराला उत्तेजन दिल्याच्या आरोपखाली मूसेवाला यांच्या विरोधात गुन्हा दाखल केला होता.