महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या महिला अध्यक्षा रूपाली पाटील या मनसेकडून पुणे पदवीधर मतदारसंघाची निवडणूक लढवीत आहेत. यावेळी सातारा जिल्ह्यातून एका तरुणाने फोन करून 'जिथे असशील तिथे संपवून टाकू. आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस' अशी धमकी दिली आहे. याप्रकरणी तपास करून धमकी देणाऱ्याला अटक करण्याची मागणी पाटील यांनी पुणे पोलिसांकडे केली आहे.
शनिवारी त्यांच्या मोबाईलवर एका अज्ञात नंबरवरून अज्ञात नंबरवरून फोन आला. 'मी सातारा जिल्ह्यातून लबाडे बोलत असून, आमदार होण्याचा प्रयत्न करू नकोस. अन्यथा पुण्यात जिथे असशील तिथे संपवून टाकू.' अशी धमकी दिली. पाटील यांचा फोन त्यांच्या सहकारी महिलेकडे होता. या फोनमुळे ही सहकारी महिला प्रचंड घाबरली. यासंदर्भात रूपाली पाटील यांच्याशी संपर्क साधला असता, त्यांनी फोनवरून धमकी मिळाली असून मी असल्या धमक्यांना घाबरत नाही. यासंदर्भात पुणे पोलिसांकडे तक्रार अर्ज दाखल केल्याचे सांगितले.