राज्यातील तीन माजी लाचखोर शिक्षणाधिकाऱ्यांना पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने मोठा झटका दिला आहे. बेहिशेबी कोट्यवधी रुपयांची मालमत्ता जमविल्याप्रकरणी माजी शिक्षणाधिकारी किरण लोहार, तुकाराम सुपे आणि विष्णू कांबळे विरोधात पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने गुन्हा दाखल केला आहे.
पुणे लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने सेवानिवृत्त तुकाराम नामदेव सुपे, विष्णू मारुतीराव कांबळे, सेवानिवृत्त शिक्षणाधिकारी,त्यांची पत्नी जयश्री विष्णू कांबळे आणि किरण आनंद लोहार, शिक्षणाधिकारी, प्राथमिक शिक्षण विभाग, जिल्हा परिषद सोलापूर, पत्नी सुजाता किरण लोहार, मुलगा निखिल किरण लोहार यांच्याविरोधात गुन्हा दाखल केला आहे. एकाचवेळी तीन अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल होण्याची ही राज्यातील बहुधा ही पहिलीच वेळ आहे.
दरम्यान, सोलापूर जिल्हा परिषदेमधील प्राथमिक शिक्षण विभागाचे तत्कालीन शिक्षणाधिकारी किरण लोहारकडे परिक्षण कालावधीमध्ये भ्रष्ट व गैरमार्गाने कायदेशीर आणि ज्ञात उत्पन्नापेक्षा अधिक ५ कोटी ८५ लाख ८५ हजार ६२३ रुपयांची बेहिशेबी मालमत्ता सापडली आहे.
महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषदेचे माजी आयुक्त तुकाराम सुपेवर ३.५९ कोटी रुपयांची बेहिशोबी संपत्ती जमवल्याप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुपेविरुद्ध लाचलुचपत प्रतिबंधक कायद्याच्या कलमांतर्गत सांगवी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. तुकाराम सुपेला अटकही झाली होती. सध्या ते सेवानिवृत्त आहे.