Pune :कोयता हल्ल्यातून विद्यार्थिनीला वाचवणाऱ्या दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस

बुधवार, 28 जून 2023 (09:00 IST)
सदाशिव पेठ येथे एका २० वर्षीय विद्यार्थिनीवर कोयत्याने वार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. आरोपीने एकतर्फी प्रेमातून तरुणीवर जीवघेणा हल्ला केला. या हल्ल्यात पीडित तरुणी गंभीर जखमी झाली असून तिला रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. तसेच या हल्ल्यानंतर पळून जाणाऱ्या आरोपीला नागरिकांनी पकडलं आहे.
 
आरोपीने जेव्हा पीडित तरुणीवर कोयत्याने हल्ला केला, तेव्हा पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी स्वत:चा जीव धोक्यात घालून आरोपीचा प्रतिकार केला. यानंतर आरोपी घाबरून घटनास्थळावरून पळून गेला. या दोन्ही तरुणांचं सोशल मीडियातून कौतुक केलं जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते जितेंद्र आव्हाड यांनीही या दोघांचं मनभरुन कौतुक केलं आहे. शिवाय दोघांना प्रत्येकी ५१ हजारांचं बक्षीस जाहीर केलं आहे.

जितेंद्र आव्हाड ट्वीट करत म्हणाले, “पुण्यात एमपीएससीची तयारी करणाऱ्या लेशपाल जवळगे आणि हर्षद पाटील या दोन तरुणांनी आपले प्राण धोक्यात घालून आज एका मुलीचा जीव वाचवला. या दोन्ही तरुणांना माझ्याकडून प्रत्येकी ५१ हजार रुपयांचे बक्षीस जाहीर करत आहे. या बक्षीसातून त्यांच्या धाडसाचं मूल्य करता येणार नाही. पण त्यांच्या पुढील शिक्षणासाठी त्यांना मदत नक्कीच होईल.”
 
Edited By - Ratnadeep ranshoor 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती