पोलिसांची मोठी कारवाई, 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त

गुरूवार, 28 जानेवारी 2021 (07:38 IST)
पिंपरी-चिंचवड पोलिसांनी मध्यप्रदेश येथे जाऊन मोठी कारवाई करत 24 पिस्तुल आणि 38 जिवंत काडतुसे जप्त केली आहेत. एकूण 12 जणांना अटक करण्यात भोसरी पोलिसांना यश आले आहे. विशेष म्हणजे मुख्य आरोपी हे युट्युबवर पिस्तूलाच्या व्हिडिओ खाली कॉमेंट करून संबंधित पिस्तुल हवी असलेल्या व्यक्तींशी संपर्क करत होते अशी माहिती भोसरी पोलिसांनी दिली आहे.
 
या प्रकरणी मुख्य आरोपी बाबलुसिंग उर्फ रॉनी अत्तरसिंग बरनाला, कालु उर्फ सुशील मांगीलाल पावरा, रुपेश उर्फ संतोष सुरेश पाटील, उमेश अरुण रायरीकर, बंटी उर्फ अक्षय राजू शेळके, धीरज अनिल ढगारे, दत्ता उर्फ महाराज सोनबा मरगळे, माँटी संजय बोथ उर्फ माँटी वाल्मिकी, यश उर्फ बबलू मारुती दिसले, अमित बाळासाहेब दगडे, राहुल गुलाब वाल्हेकर, संदीप आनंता भुंडे यांना अटक करण्यात आली आहे.
 
पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, खून, खुनाचा प्रयत्न, दरोड्याची तयारी, जबरी चोरी, आर्म ऍक्ट असे गंभीर गुन्हे दाखल असलेल्या आरोपी रुपेश सुरेश पाटील याला पोलीस कर्मचारी सुमित देवकर, गणेश सावंत यांनी चार पिस्तुल आणि चार जिवंत काडतुसासह अटक केली. दरम्यान, या प्रकरणाची सखोल चौकशी केली असता हे प्रकरण मध्यप्रदेशपर्यंत असल्याचं समोर आलं. त्यानुसार, भोसरी पोलिसांचं एक पथक मध्यप्रदेश येथे रवाना झाले. तेथून उमर्टी मध्यप्रदेश येथील एका जंगलातून सापळा रचून मुख्य आरोपी पिस्तुल डीलर रॉनी उर्फ बाबलुसिंग अत्तारसिंग बरनाला याला अटक करून त्याच्याकडून 8 पिस्तुल आणि 20 जिवंत काडतुसे जप्त करण्यात आली तसेच त्याचा साथीदार कालु उर्फ सुशील मांगीलाल पावरा याला ताब्यात घेण्यात आले. 
 
त्याच्याकडून देखील दोन पिस्तुल आणि पाच जिवंत काडतुसे हस्तगत करण्यात आली. दोन्ही आरोपी हे युट्युबवर असलेल्या पिस्तूलाच्या व्हिडिओखाली कॉमेंट करून पिस्तुल हवी असलेल्या व्यक्तीशी संपर्क करायचे. तसेच स्वतःचा मोबाईल क्रमांक देऊन पिस्तूला संबंधी माहिती देत अशी माहिती उघड झाली आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती