पिंपरी-चिंचवड स्थायी समिती सभापतीपदी नितीन लांडगे विजयी, राष्ट्रवादीचा पराभव

शुक्रवार, 5 मार्च 2021 (16:14 IST)
पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती सभापती पदाची निवडणूक झाली. त्यात पाच विरुद्ध दहा मतांनी लांडगे विजयी झाले. पिंपरी चिंचवड महापालिका स्थायी समिती अध्यक्षपदाची निवडणूक (दि. ५) झाली. भाजपचे नगरसेवक फोडून सत्तांतराचा ‘सांगली पॅटर्न‘ पिंपरी-चिंचवड महापालिकेतही घडविण्याची राष्ट्रवादी काँग्रेसची घोषणा तूर्त तरी ‘फुसका बार‘ ठरली आहे. स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे पाटील यांनी याबाबत प्रसिद्धीमाध्यमांशी बोलताना पिंपरी-चिंचवड महापालिकेत सांगली पॅटर्न घडविणार असल्याचा दावा केला होता, तथापि, स्थायी समिती अध्यक्ष निवडणुकीत सत्तारूढ भाजपचे अॅड. नितीन लांडगे हेच विजयी झाल्याने राष्ट्रवादी काँग्रेसच्या दाव्यातील फोल  ठरला  आहे.
 
भाजपचे नाराज 12 ते 15 नगरसेवक राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे वक्तव्य वाघेरे यांनी केले होते. त्यातच भारतीय जनता युवा मोर्चाचे शहराध्यक्ष रवी लांडगे यांना स्थायी समिती अध्यक्षपदासाठी भाजपने उमेदवारी नाकारल्यामुळे त्यांनी महापौरांकडे स्थायी समिती सदस्यत्वाचा राजीनामा सादर केला. या पार्श्वभूमीवर भाजपमधील नाराजीचा फायदा मिळण्याची आशा राष्ट्रवादी काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना वाटत होती. प्रत्यक्षात निवडणुकीच्या निकालानंतर राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांनी केलेल्या घोषणा या निव्वळ वल्गना ठरल्याचे दिसून येत आहे.
 
भाजपचे नगरसेवक फोडून पिंपरी-चिंचवड महापालिकेतही सत्तांतर घडविण्याची व्यूहरचना राष्ट्रवादी काँग्रेसच्या वरिष्ठ नेत्यांनी आखली. त्यानुसार ऑपरेशन ‘सांगली पॅटर्न’ सुरू देखील झाले, मात्र राष्ट्रवादी काँग्रेसच्या शहराध्यक्षांनी त्याबाबत जाहीर वाच्यता केल्यामुळे भाजपचे वरिष्ठ नेते सावध झाले आणि राष्ट्रवादीचा कावा यशस्वी होण्यापूर्वीच भाजप नेत्यांनी त्यांच्या पद्धतीने ‘डॅमेज कंट्रोल’ केले. या पार्श्वभूमीवर राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष संजोग वाघेरे यांना त्यांच्या पक्षांतर्गत विरोधकांकडून ‘लक्ष्य’ बनविले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती