पुणे जिल्ह्यातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या आगामी सार्वत्रिक निवडणुका लक्षात घेता, महानगरपालिकेच्या अखत्यारीत येणाऱ्या विधानसभा मतदारसंघांचे प्रभागनिहाय विभाजन करून तयार केलेली प्रारूप मतदार यादी 6 नोव्हेंबर रोजी प्रसिद्ध केली जाणार आहे. 6 नोव्हेंबर ते 14 नोव्हेंबर या कालावधीत नागरिकांना या प्रारूप यादीवर त्यांच्या हरकती आणि सूचना नोंदवण्याची संधी देण्यात आली आहे.
प्रारूप मतदार यादीवर प्राप्त झालेल्या हरकती आणि सूचनांची तपासणी, सुनावणी आणि निर्णय घेण्यासाठी, संयुक्त शहर अभियंता अजय सूर्यवंशी, अनिल भालसाकळे, माणिक चव्हाण आणि सुनील भगवानी यांची अधिकृत अधिकारी म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे, असे क्षेत्रीय कार्यालयांनी सांगितले. या संदर्भातील आदेश अतिरिक्त आयुक्त प्रदीप जांभळे पाटील यांच्या स्वाक्षरीने जारी करण्यात आला.