रूपेश कृष्णा मारणे, सुनील नामदेव बनसोडे, संतोष सुधाकर शाळीमकर, महेश काशिनाथ गुरव, सचिन अप्पा ताकवले, श्रीकांत संभाजी पवार अशी जामीन अर्ज फेटाळलेल्यांची नावे आहेत. १५ फेब्रुवारी रोजी तळोजा मध्यवर्ती कारागृहातून गुंड गजा मारणे याची सुटका झाली. त्यावेळी मारणे त्याच्या साथीदारांसह सार्वजनिक ठिकाणी दहशत निर्माण करण्याच्या उद्देशाने बेकायदा गर्दी जमवून फटाके वाजवून आरडा-ओरडा करत त्याचे चित्रीकरण केले. तसेच मास्क न लावता कोरोनाच्या नियमांचे उल्लंघन केले. या प्रकरणी त्याच्यासह साथीदारांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
या प्रकरणी अटकपूर्व जामीन मिळावा यासाठी सहाजनांनी अर्ज दाखल केला होता. या अर्जाला सरकारी वकील विलास घोगरे-पाटील यांनी विरोध केला. आरोपींनी आणखी कुठे दहशत निर्माण केली आहे का?, गुन्ह्याच्या सखोल तपासासाठी त्यांना अटक होणे गरजेचे आहे. त्यामुळे त्यांचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळण्यात यावा, असा युक्तिवाद अॅड. घोगरे-पाटील यांनी केला. न्यायालयाने सरकारी पक्षाचा युक्तिवाद ग्राह्य धरत सहा जणांचा अर्ज फेटाळला. या प्रकरणातील मुख्य आरोपी गजानन मारणे याने २५ फेब्रुवारी रोजी वडगाव मावळ येथील प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारीसमोर हजर होऊन जामीन घेतला आहे.