नरेंद्र मोदी पुणे दौरा- यापूर्वी भूमीपूजन झाल्यानंतर प्रकल्प कधी पूर्ण होईल हे माहीत नसायचं

रविवार, 6 मार्च 2022 (14:16 IST)
'छत्रपती शिवाजी महाराज, महात्मा जोतिबा फुले, सावित्रीबाई फुले, महर्षी कर्वे यांच्या शह अनेक प्रतिभाशाली समाजसुधारक, कलाकार यांच्या वास्तव्याने पावन झालेल्या पुण्यातील नागरिकांना माझा नमस्कार,' असं म्हणत पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणेकरांशी संवाद साधला.
 
पुण्यातील मआयटी महाविद्यालयाच्या मैदानावर जाहीर सभेत पंतप्रधान पुणेकरांनी संबोधित करत होते.
 
पुणे मेट्रोसह पुण्यातील विविध उपक्रमांच्या उद्घाटनासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी आज (6 मार्च) पुणे दौऱ्यावर आहेत.
 
या दौऱ्यामध्ये पुणे मेट्रोच्या वनाज ते गरवारे आणि फुगेवाडी ते पिंपरी या पहिल्या दोन टप्प्यांचे उद्घाटन त्यांच्या हस्ते झालं. यावेळी पंतप्रधानांनी स्वत: गरवारे मेट्रो स्टेशनवरून मेट्रोमध्ये चढत मेट्रोने प्रवास देखील केला.
त्यानंतर झालेल्या सभेत बोलताना पंतप्रधानांनी म्हटलं, की पुण्याच्या मेट्रोच्या भूमिपूजनाला मला तुम्ही बोलावलं आणि उद्घाटनला सुद्धा बोलवला. ही गोष्ट महत्त्वाची आहे. कारण आधीच्या काळात आधी भूमिपूजन व्हायचं आणि प्रकल्प पूर्ण कधी होणार हे कळायचं नाही.
 
पाच वर्षांपूर्वी 24 डिसेंबरला पंतप्रधान नरेंद्र मोदींनी पुणे मेट्रोचं भूमीपूजन केलं होतं.
 
पंतप्रधानांच्या भाषणातले महत्त्वाचे मुद्दे-
काही वेळा पूर्वी गरवारे ते आनंदनगरपर्यंत प्रवास केला. प्रदूषण आणि ट्रॅफिकपासून यामुळे दिलासा मिळेल
देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री होते तेव्हा या पुणे मेट्रोसाठी ते अनेकदा दिल्लीला यायचे. त्यांच्या प्रयत्नांबद्ल मी आभार मानतो.
या प्रोजेक्टसाठी काम केलेल्या श्रमिकांचे आभार व्यक्त करतो.
देशात वेगाने शहरीकरण होत आहे. 2030 पर्यंत शहरी लोकसंख्या 60 करोडच्या पुढे जाईल. लोकसंख्या वाढल्यावर अनेक आव्हानं देखील येतात. आज देशात दोन डझन शहरांमध्ये मेट्रो सुरू झाली किंवा काम सुरू झाले आहे. शिक्षित लोकांना माझा आग्रह आहे की मेट्रो ने प्रवास करण्याची सवय सगळ्यांनी करायला हवी.
शिक्षित लोकांना माझा आग्रह आहे की मेट्रो ने प्रवास करण्याची सवय सगळ्यांनी करायला हवी.
प्रत्येक शहरात ग्रीन ट्रान्सपोर्ट असावं असा आमचा प्रयत्न आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत राज्यपाल भगतसिंह कोश्यारी, उपमुख्यमंत्री अजित पवार, विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस, एकनाथ शिंदे, पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ आदी उपस्थित आहेत.
 
पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या दौऱ्यापूर्वी काँग्रेसनं काळे कपडे घालून मोदींच्या दौऱ्याचा निषेध केला. राष्ट्रवादी काँग्रेसकडून देखील काळे कपडे घालून मोदींच्या दौऱ्याचा निषेध करण्यात आला.
पुण्यातील डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर राष्ट्रवादीचे कार्यकर्ते काळे शर्ट घालून आंदोलन करत होते. अर्धवट असलेल्या मेट्रोचे उदघाटन मोदी करतायेत त्याचबरोबर युक्रेन मध्ये अडकलेल्या विद्यार्थ्यांना आणण्या ऐवजी मोदी उदघाटन करत असल्याचा आरोप देखील राष्ट्रवादी कडून करण्यात येत आहे.
 
पुण्यासाठी स्वप्नपूर्तीचा दिवस- देवेंद्र फडणवीस
"पुण्याकरता हा स्वप्नपूर्तीचा दिवस आहे," अशी प्रतिक्रिया विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी पुणे मेट्रोच्या उद्घाटनानंतर व्यक्त केली.
मेट्रोचं पहिलं तिकीट पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी मोबाईलवर तिकीट काढलं. आम्ही तिकीट न काढता आलो मेट्रोवाल्यांना आमचे पैसे नंतर घ्या असं सांगणार आहोत," असंही विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस म्हणाले.
 
ते पुढे म्हणाले, "प्रकल्पात अनेक अडचणी होत्या. महामेट्रोचं अभिनंदन करीन. महामेट्रोने विक्रमी वेळेत पुणे मेट्रोचं काम पूर्ण केलं आहे. मेट्रोने नवं मॉडेल प्रस्थापित केलं. महापालिकेनं केलेली कामं उत्तम आहेत कारण केंद्र सरकार ताकदीने मागे उभं राहिलं. चांगली वाहतूक व्यवस्था असलेलं शहर आपल्याला पाहायला मिळेल.
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती