युद्धसदृश परिस्थिती लक्षात घेता, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, आज दुपारी 4 वाजता पुणे जिल्ह्यातील 3 ठिकाणी मॉकड्रिल घेण्यात येणार आहे. जिल्हाधिकारी जितेंद्र दुड्डी यांनी पत्रकार परिषदेत ही माहिती दिली. दरम्यान, ही मॉकड्रील केवळ खबरदारीचा उपाय म्हणून घेण्यात येत असून यावेळी भोंग्याला कोणीही घाबरू नये, असे आवाहन जिल्हाधिकाऱ्यांनी केले आहे.
पहलगाममधील दहशतवादी हल्ल्यानंतर भारताने पाकिस्तानविरुद्ध कारवाईचे मोठे संकेत दिले आहेत. सध्या भारत आणि पाकिस्तानमधील युद्धाची सर्वत्र खूप चर्चा आहे. या पार्श्वभूमीवर, खबरदारीचा उपाय म्हणून, केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, देशातील 244 ठिकाणी मॉक ड्रिल आयोजित केले जात आहेत, जेणेकरून युद्धाच्या परिस्थितीत कोणती खबरदारी घ्यावी हे जाणून घेता येईल.
केंद्र सरकारच्या सूचनेनुसार, राज्य सरकारने आज या मॉक ड्रिलच्या तयारीसाठी बैठक घेतली. या बैठकीत महाराष्ट्रातील पुणे, ठाणे, रत्नागिरी, मुंबई आणि सिंधुदुर्ग येथे मॉकड्रिल घेण्यात येईल. ही मॉकड्रील पुणे शहरातील विधानभवन आणि जिल्ह्यातील तळेगाव नगरपरिषद आणि मुळशी पंचायत समिती येथे दुपारी 4 वाजता आयोजित केली जाईल. यामध्ये लष्कर, पोलिस, हवाई दल, अग्निशमन विभाग, आरोग्य यंत्रणा, महसूल विभाग, महाविद्यालयीन विद्यार्थी, एनसीसी कॅडेट्स इत्यादी सहभागी होतील.
युद्धाच्या परिस्थितीत देशात कुठेही लष्करी हल्ला झाल्यास कमीत कमी वेळेत मदतकार्य कसे करता येईल आणि सामान्य लोकांना या आपत्तीतून कसे वाचवता येईल यासाठी हे मॉक ड्रिल आयोजित केले जात आहे. या मॉक ड्रिलमध्ये फक्त मदतकार्य आणि खबरदारी घेतली जाईल. युद्धादरम्यान, मोठ्या शहरांमधील महत्त्वाच्या इमारती आणि सरकारी कार्यालयांना अनेकदा लक्ष्य केले जाते. म्हणून, शहरातील विधान भवनाची मॉक ड्रिलसाठी निवड करण्यात आली आहे.
पुणे शहरात दुपारी 4 वाजता मॉकड्रिल होईल आणि कुठेही ब्लॅकआउट होणार नाही, असे जिल्हाधिकारी डूडी यांनी सांगितले. मॉक ड्रिल दरम्यान बचाव कार्याचा सराव केला जाईल. ही मॉक ड्रिल लष्करी अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनाखाली आणि सूचनांनुसार घेतली जाईल.