वाकड परिसरातील सुनिल ठाकुर टोळीवर मोक्का

सोमवार, 29 मार्च 2021 (16:23 IST)
पुण्याच्या वाकड परिसरातील सराईत गुन्हेगार सुनील ठाकूर टोळीवर पिंपरी चिंचवड पोलिसांनी महाराष्ट्र संघटित गुन्हेगारी नियंत्रण अधिनियम सन 1999 (मोक्का) ची कारवाई केली आहे. याबाबतचे आदेश सोमवारी (दि. 29) अपर पोलीस आयुक्त रामनाथ पोकळे यांनी दिले आहेत.टोळी प्रमुख सुनिल विश्वनाथ ठाकुर (वय 23, रा. जय मल्हार नगर, थेरगांव, पुणे), विजय राहुल तलवारे (वय 19, रा. अमरदिप कॉलनी, रहाटणी, पुणे) अशी कारवाई झालेल्या आरोपींची नावे आहेत.
 
वरिष्ठ पोलीस निरीक्षक डॉ. विवेक मुगळीकर यांनी दिलेल्या माहितीनुसार, आरोपी सुनील आणि विजय याच्यावर वाकड पोलीस ठाण्यात खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा दाखल आहे. तसेच त्यांच्यावर पिंपरी चिंचवड शहरातील हिंजवडी, सांगवी आणि वाकड पोलीस ठाण्यात जबरी दुःखापत करणे, जिवे ठार मारण्याचा प्रयत्न करणे, बेकायदेशीर जमाव जमवून घरात घुसून सामानाची तोडफोड व नुकसान करुन दहशत माजवून नागरिकांच्या खिडकीच्या काचा फोडुन नुकसान करुन नाहक त्रास देणे, मारहाण करुन जबरी चोरी, बेकायदेशीर जमाव जमवून घातक शस्त्रांनी दहशत निर्माण करणे, असे एकूण सात गुन्हे दाखल आहेत.
 
आरोपींनी संघटीत गुन्हेगारी टोळी बनवून हिंसाचाराचा वापर करून वर्चस्वासाठी व आर्थिक फायद्यासाठी संघटितपणे गुन्हे करीत असल्याचे निष्पन्न झाले आहे. त्यामुळे त्यांच्या विरोधात मोक्काची कारवाई करण्यासाठी अपर पोलीस आयुक्तांकडे प्रस्ताव पाठवला होता. त्यास मान्यता देऊन सोमवारी अपर पोलीस आयुक्तांनी दोन्ही गुन्हेगारांवर मोक्का अंतर्गत कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती