कोरेगाव भिमा येथील लढाईला २०० वर्ष होत असल्याच्या निमित्ताने शनिवारवाडा येथे ३१ डिसेंबर २०१७ रोजी एल्गार परिषदेचे आयोजन करण्यात आले होते. त्यानंतर दुसर्या दिवशी कोरेगाव भिमा येथे मोठी दंगल झाली होती. त्याचे महाराष्ट्रासह देशभर पडसाद उमटले होते. या परिषदेच्या आयोजनमध्ये बंदी असलेल्या माओवादी संघटनांचा हात असल्याचे पोलीस तपासात निष्पन्न झाले होते. यातून देशभरातील अनेक डाव्या विचारसरणीचे ज्येष्ठ कार्यकर्ते, लेखक, कवी यांच्यावर गुन्हे दाखल होऊन त्यांना अटक करण्यात आली आहे.
याबाबत निवृत्त न्यायमूर्ती बी. जी. कोळसे पाटील यांनी सांगितले की, एल्गार परिषद हा सांस्कृतिक कार्यक्रम आहे. त्याला अकारण बदनाम केले गेले आहे. तर स्वारगेट पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक ब्रम्हानंद नाईकवडी यांनी सांगितले की, लोकशासन आंदोलन या संस्थेकडून परिषदेला परवानगी मिळावी, असा अर्ज करण्यात आला आहे. मात्र, अद्याप कोणतीही परवानगी देण्यात आलेली नाही.