आरोग्य विज्ञान विद्यापीठाच्या जेनेटिक लॅबचे राज्यपालांच्या हस्ते उद्घाटन

शुक्रवार, 11 नोव्हेंबर 2022 (22:04 IST)
समाजासाठी आरोग्य शिक्षण, संशोधन आणि रोग निदान त्रिसूत्री महत्वाची असल्याचे प्रतिपादन विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी केले. महाराष्ट्र आरोग्य विज्ञान विद्यापीठाचे पुणे येथील डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब व कॅन्सर रिसर्च सेंटरचे उद्घाटन, नॅशनल एड्स रिसर्च इन्स्टिट्यूट आणि नॅशनल सेंटर फॉर सेल सायन्स यांच्या समवेत परस्पर सामंजस्य कराराचे आदान-प्रदान करण्यात आले व ‘मानस’ अॅपचा प्रारंभ विद्यापीठाचे मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांच्या हस्ते करण्यात आले. या कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मा. राज्यपाल यांच्या समवेत विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) प.वि.से.प., अ.वि.से.प., वि.से.प., भारतीय औषध संशोधन संस्थेचे अध्यक्ष डॉ. सुहास जोशी आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
 
या प्रसंगी अध्यक्षीय भाषणात मा. मा. कुलपती तथा राज्यपाल श्री. भगत सिंह कोश्यारी यांनी सांगितले की, आरोग्य शिक्षण आणि संशोधन या पायाभूत संकल्पना आहेत. विविध रोग व त्यावर उपचार शोधण्यासाठी मोठया प्रमाणात प्रयत्न करण्यात येतात. संशोधन ही तपस्या आहे. विद्यापीठाच्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून विविध चाचण्या होणार असून त्याचा समाजाला मोठया प्रमाणात उपयोग होणार आहे. कॅन्सर आजारावर अन्य पध्दतीत उपचार करण्यासाठी संशोधन होणे गरजेचे आहे. दूर्गम भागातील लोकांना आरोग्य सेवा अत्यल्प दरात उपलब्ध व्हाव्यात यासाठी शासनाकडून विविध उपक्रम राबविण्यात येतात. याची माहिती व प्रसार होणे गरजेचे आहे यासाठी सर्वांनी प्रयत्नशील रहावे.
 
ते पुढे म्हणाले की, आरोग्य शिक्षण, संशोधन, प्रभावी प्रात्यक्षिके आदींचा विस्तार होणे गरजेचे आहे. जेनेटिक व मॉलीक्युलर बायोलॉजी क्षेत्र यामध्ये संशोधन कार्याला मोठा वाव आहे. विद्यापीठाने सुरु केलेल्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून संशोधनाला बळ मिळणार असून त्याचा विस्तार होणे क्रमप्राप्त आहे. मूलभूत संशोधनाचा लाभ समाजापर्यंत पोहचण्यासाठी विद्यापीठाने प्रयत्नशील रहावे असे त्यांनी सांगितले.
 
या लॅबमध्ये होणार ही तपासणी
कार्यक्रमाच्या प्रास्ताविकात विद्यापीठाच्या मा. कुलगुरु लेफ्टनन्ट जनरल माधुरी कानिटकर (निवृत्त) यांनी संागितले की, विद्यापीठाकडून सुरु करण्यात आलेल्या जेनेटिक लॅबच्या माध्यमातून विविध संशोधन व उपक्रमांना चालना मिळणार आहे. या लॅबच्या कार्यासह टेलिमेडिसिन उपचार तसेच कॅन्सरसाठी विशेष संशोधन आरोग्य क्षेत्रात संशोधन व तंत्रज्ञानाचा वापर मोठया प्रमाणात होत आहे. जेनेटिक मॉलेक्युल संदर्भात अभ्यासक्रम व संशोधनाला चालना मिळावी याकरीता विद्यापीठ प्रयत्नशील आहे. या अनुषंगाने डॉ. घारपुरे मेमोरिअल जेनेटिक लॅब तयार करण्यात आली आहे. या लॅबमध्ये हे प्रामुख्याने कर्करोगाची क्लोनल आणि उपचारात्मक पध्दतीसाठी आवश्यक तपासणी करण्यात येतील. तसेच कर्करोगावर संशोधन करण्यावर लक्ष केंद्रित करण्यात येईल असे त्यांनी सांगितले. विद्यापीठातर्फे फेलोशिप इन क्लिनीकल अॅण्ड लॅबोरटरी जेनेटिक्स यासारखे अभ्यासक्रम सुरु करण्यात येणार आहेत. विद्यापीठाकडून नवीन फेलोशिप अभ्यासक्रमास प्रारंभ करण्यात येणार आहे यामध्ये क्लिनिकल आणि लॅबोरटरी जेनेटिक्सचा समावेश असणार आहे. तसेच जेनेटिक डाग्नॉस्टिक विषयावर प्रमाणपत्र अभ्यासक्रमाला प्रारंभ करण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
 
Edited  By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती