आदिवासींच्या हक्कासाठी लढणार्‍या कुसुम कर्णिक यांचं निधन

गुरूवार, 3 नोव्हेंबर 2022 (11:01 IST)
पुणे- आदिवासी समाजासाठी लढा देणाऱ्या जेष्ठ सामाजिक कार्यकर्त्या कुसुम ताई कर्णिक यांचे 89 व्या वर्षी अल्पशा आजाराने निधन झाले. आदिवासी जनतेचे मातृत्व हरपल्याने हळहळ व्यक्त केली आहे.
 
१९८० च्या काळात कुसुमताई आणि त्यांचे पती स्वर्गीय आनंद कपूर या दोघांनी मिळून स्थापन केलेल्या शाश्वत संस्थेच्या माध्यमातून आदिवासी भागामध्ये भरपूर कामे केली.  भीमाशंकर परिसरातील आदिवासी बांधवासाठी कुसुम ताईंचं मोठं योगदान आहे. 
 
ताईंनी आदिवासी, दलित, स्त्रिया, अपंग व इतरही वंचित आणि शोषितांवर होणाऱ्या अन्याय व अत्याचाराविरुद्ध सत्याग्रह, आंदोलनं, उपोषणं, धरणं, रस्ता रोको आदी मार्गाने वाचा फोडली. त्यांनी केलेलं काम अत्यंत प्रेरणादायी आहे.
 
शाश्वत संस्थेच्या माध्यमातून त्यांनी आदिवासी भागामध्ये भरपूर कामे केली. त्यात डिंभे धरण आदिवासींच्या ताब्यात देण्यासाठी चळवळ, सरकारच्या रोजगार हमी योजनेत पडकई समाविष्ट करण्यासाठीचे आंदोलन, हिरडा प्रश्न, आदिवासींचे खातेफोड, जातींचे दाखले, अभयारण्याच्या समस्या यांचा प्रामुख्याने समावेश आहे. 
 
त्यांनी मेधा पाटकर यांच्यासमवेत नर्मदा बचाव आंदोलनात सहभाग घेतला होता. त्यांच्या निधनामुळे आदिवासींच्या हक्कासाठी लढणारा आवाज हरपला आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती