स्मार्ट सिटी सायबर हल्लाप्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी

शुक्रवार, 12 मार्च 2021 (10:58 IST)
शेकडो कोटी खर्चून तयार केलेल्या स्मार्ट सिटी सर्व्हरवर सायबर हल्ला होऊन डेटा चोरीसारखा प्रकार होणे, ही बाब पिंपरी-चिंचवडकरांची सुरक्षितता धोक्यात टाकणारी आहे. स्मार्ट सिटीच्या नावाखाली निकृष्ट दर्जाचे काम व गलथान कारभार सुरू आहे. सत्य समोर येण्यासाठी संबधित कंत्राटदार, सहकंत्राटदार कंपन्यांचे कनेक्शन तपासणे आवश्यक आहे. त्या करिता या संपूर्ण प्रकरणाची उच्चस्तरीय चौकशी करावी, अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेस शहराध्यक्ष संजोग वाघेरे-पाटील यांनी केली आहे.
 
पिंपरी-चिंचवड स्मार्ट सिटी कंपनीच्या सर्व्हरवर सायबर हल्ला झाल्याची तक्रार टेक महिंद्रा कंपनीच्या अधिका-यांनी पोलिसांकडे दिली आहे. या तक्रारीत सायबर हल्ल्याव्दारे अज्ञात व्यक्तीने सर्व्हरमधील डाटा इन्क्रिप्ट करून बिटकॉईनद्वारे पैशाची मागणी केल्याचे म्हटले आहे.
 
या सगळ्यात पाच कोटी रुपयांचे नुकसान झाल्याचा दावाही संबधित कंपनीने केला आहे. स्मार्ट सिटी कंपनी स्थापन केल्यापासून शहर स्मार्ट करण्याच्या नावाखाली हजारो कोटी रुपयांची कामे काढण्यात आली आहेत. केंद्र सरकारच्या नावावर सुरू असलेल्या या प्रकल्पात पिंपरी-चिंचवड महानगरपालिकेच्या तिजोरीतून मोठा खर्च केला जात आहे. शहर स्मार्ट करण्यासाठी टेक महिंद्रा कंपनीला स्मार्ट सिटी कंपनीमार्फत दिलेले काम सुमारे चारशे कोटींहून अधिक रकमेचे आहे. या कामात घडलेला हा प्रकार गंभीर असून स्मार्ट सिटीच्या कारभाराबरोबर पिंपरी-चिंचवडच्या सुरक्षिततेवरही प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती