आरोग्यसेविका, सेवकांवर अन्याय केला जाते आहे. जेवण निकृष्ट दर्जाचे दिले जाते. ते देखील वेळेवर मिळत नाही. त्यामुळे स्टाफनर्स काम करण्यासाठी इच्छुक नाहीत. कोरोना काळात करत असलेल्या कामामुळे या महिन्यात वेतनात वाढ करण्याचे आश्वासन व्यवस्थापनाने दिले होते. पण, वेतन वाढले नाही. स्टाफ कमी आहे. नर्स नसताना त्यांचे कपडे हाऊसकिपिंग कर्मचा-यांना दिले जातात आणि नर्स म्हणून ते रुग्णालयात फिरतात, असा धक्कादायक आरोपही करण्यात आला आहे.
यामुळे रुग्ण, रुग्णाच्या नातेवाईकाला ते नर्स असल्याचेच वाटते. आम्हाला दिले जाणारे कपडे व्यवस्थित दिले जात नाहीत. रोटेशन व्यवस्थित नाही. वाढीव वेतन दिले नाही, असे या कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे. तसेच, रुग्णसेविका, रुग्णसेवकावर प्रचंड अन्याय होत आहे. कोविड रुग्णालयात सहा तासच ड्युटी करण्याचा निर्णय आहे. पण, आम्हाला सात-सात, 12-12 तास ड्युटी करावी लागत आहे. यामुळे ताण येत आहे. राजीनामा दिला तरी चालेल असे सांगितले जात आहे, अशी भावना आंदोलनकर्त्यांनी व्यक्त केली.
रुग्णालय व्यवस्थापनाच्या विरोधात भूमिका घेतल्यास किंवा मागण्या मान्य करण्यासाठी तगादा लावल्यास स्टाफ, बाऊंसरच्या माध्यमातून दबाव आणण्याचा प्रयत्न केला जातो, असा आरोप आंदोलनकर्त्यांनी केला आहे. या कर्मचाऱ्यांनी दिवसभर आंदोलन करणार असल्याचे सांगितले. अनुचित प्रकार घडू नये, यासाठी पोलीस ही रुग्णालयासमोर दाखल झाले आहेत.