लशींच्या कमतरतेमुळे लसीकरण पूर्ण क्षमतेने राबविता येत नाही – आयुक्त पाटील

गुरूवार, 29 जुलै 2021 (15:30 IST)
पिंपरी-चिंचवड शहराला कोरोना प्रतिबंधात्मक लशींचा पुरवठा कमी होत आहे. त्यामुळे लसीकरण मोहीम पूर्ण क्षमेतेने राबविता येत नसल्याचे आयुक्त राजेश पाटील यांनी सांगितले.
 
महानगरपालिकेच्या ब क्षेत्रीय कार्यालयात  प्रभाग अध्यक्ष, नगरसेवक अधिका-यांसमवेत प्रभाग क्रमांक 18 आणि 22 मधील समस्यांबाबत बैठक आयोजित करण्यात आली होती. प्रभाग अध्यक्ष सुरेश भोईर, नगरसेवक विनोद नढे, राजेंद्र गावडे, नगरसेविका अपर्णा डोके, अश्विनी चिंचवडे, नीता पाडाळे, स्वीकृत नगरसदस्य विठ्ठल भोईर, क्षेत्रीय अधिकारी सोनल देशमुख तसेच स्थापत्य, विद्युत, पाणीपुरवठा, आरोग्य, वैद्यकीय, विभागांचे अधिकारी उपस्थित होते.
 
उपस्थित नगरसदस्यांनी नदी सुधार प्रकल्प आणावा, रस्त्यावरील अतिक्रमणे काढण्यात यावीत, पालिकेने हाती घेतलेले प्रकल्प तातडीने पूर्ण करावेत, काळेवाडी येथील रस्ते सिमेंटचे करावेत, भारतमाता चौकात हातगाडी संदर्भात कारवाई व्हावी, रस्त्यावरील अनधिकृत होर्डींग्जवर कारवाई करावी, पाणीपट्टीची बिले नागरिकांना वेळेवर मिळवीत, धूर फवारणी व्यवस्थापन नीट करावे, विद्युत खांबामध्ये विद्युत प्रवाह उतरत आहे आदी समस्या मांडल्या.
 
आयुक्त राजेश पाटील म्हणाले, नगरसदस्यांनी उपस्थित केलेल्या मुद्द्यांबाबत लवकरात लवकर कार्यवाही करण्यात येईल. तसेच त्यांनी संबंधित अधिका-यांना नगरसदस्यांनी मांडलेल्या समस्यांबाबत तातडीने कार्यवाही करावी असे आदेश दिले.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती