गर्भपाताच्यावेळी प्रेयसीचा मृत्यू; तिचा मृतदेह फेकल्यावर तिच्या जिवंत मुलांनाही नदीत फेकलं
मंगळवार, 23 जुलै 2024 (16:58 IST)
गर्भपात करताना मृत्यूमुखी पडलेली महिला आणि तिच्या दोन जिवंत मुलांना थेट इंद्रायणी नदीमध्ये फेकून देण्याचा प्रकार मावळ तालुक्यात घडला आहे. यात या दोन्ही मुलांचाही मृत्यू झाला आहे.महिला बेपत्ता असल्याची तक्रार तिच्या पालकांनी दाखल केली होती. तिचा शोध घेत असताना हा धक्कादायक प्रकार उघडकीला आला आहे.
या प्रकरणी आता पोलिसांनी संबंधित महिलेचा प्रियकर गजेंद्र दगडखैर आणि त्याचा मित्र रविकांत गायकवाड यांना अटक केली आहे. त्यांना 30 जुलैपर्यंत पोलिस कोठडीत ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिला आहे.
मावळच्या वराळे इथली रहिवासी असणारी ही 25 वर्षांची महिला बारावीच्या परीक्षेचा फॉर्म भरण्यासाठी
आपल्या मूळ गावी म्हणजे अक्कलकोटला जाते असं सांगून 5 जुलैला घराबाहेर पडली होती.
त्यानंतर ती दगडखैरचा मित्र गायकवाड याच्यासोबत कळंबोली इथं गेली. यावेळी तिची 5 वर्षं आणि
2 वर्षं अशी दोन्ही मुलं सोबत होती.
या दरम्यान तिच्याशी संपर्क होत नसल्याने तिच्या पालकांनी ती बेपत्ता असल्याची तक्रार तळेगाव पोलिस स्टेशनमध्ये दाखल केली. त्यानंतर तिचा शोध सुरु होता.या दरम्यानच पोलिसांनी या महिलेच्या शेजारी राहणाऱ्या गजेंद्र दगडखैरकडे चौकशी केली. त्यात हा प्रकार उघडकीला आला.
दगडखैर आणि या महिलेचे संबंध होते. ती गर्भवती असल्याने दगडखैरने तिचा गर्भपात करण्याचा निर्णय घेतला होता. यासाठी त्याने नगरमध्ये काम करणारा आपला मित्र रविकांत गायकवाडशी संपर्क साधला होता. त्याच्या मध्यस्थीनेच कळंबोली इथे गर्भपात करणाऱ्या महिलेशी संपर्क साधून या महिलेला 9 जुलैला तिथे नेण्यात आले.
मात्र, गर्भपात केला जात असताना या महिलेचा मृत्यू झाला. यानंतर डॉक्टरांनी पोलिसांना माहिती देण्याच्या ऐवजी या महिलेचा मृतदेह रविकांतच्या ताब्यात दिला. रविकांत महिलेचा मृतदेह आणि तिच्या दोन मुलांना घेऊन दगडखैरच्या गावी वराळेला आला.
या दोघांनीही या मृतदेहाची विल्हेवाट लावण्याचा निर्णय घेतला. तिच्या लहान मुलांसह ते तळेगाव चाकण रस्त्यावरच्या इंदोरी या गावी पोहोचले. तिथे इंद्रायणी नदीच्या पात्रात त्यांनी हा मृतदेह टाकून दिला. महिलेचा मृतदेह टाकताना तिच्या 5 वर्ष आणि 2 वर्षाच्या मुलांनी रडायला सुरुवात केली. या मुलांच्या रडण्यामुळे आपलं बिंग फुटेल म्हणून मग या दोघांनी या मुलांनाही नदीत फेकून दिलं.
मोबाईलमुळे गुन्हा आला उघडकीला
या बेपत्ता महिलेच्या मोबाईल लोकेशनचा तपास केला. त्यानुसार आरोपी गजेंद्र दगडखैर आणि रविकांत गायकवाड यांच्यापर्यंत पोलिस पोहोचले. त्यांच्याकडे चौकशी करताना दोघांनी पोलिसांकडे या प्रकाराची कबुली दिली.
या प्रकरणी आता पोलिसांनी दगडखैर आणि गायकवाडसह गर्भपात करणाऱ्या डॉक्टर आणि मध्यस्थ म्हणून काम केलेल्या महिलेविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याविषयी बीबीसी मराठीशी बोलताना पोलिस उपायुक्त बापू बांगर म्हणाले, "ही महिला दोन वर्षांपासून आपल्या पालकांसोबत वराळेमध्ये रहात होती. तिच्या पालकांनी 11 जुलैला ती बेपत्ता असल्याची तक्रार दाखल केली होती. तपासामध्ये ही महिला गरोदर असल्याचं कळलं आणि कळंबोलीला गर्भपात करण्यासाठी गेल्याचं उघडकीला झालं. त्याठिकाणी उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला. दोघांनी या महिलेचा मृतदेह नदीत फेकला.
ही घटना पाहताना तिची दोन्ही मुलं रडत होती. त्या दोन्ही मुलांना जिवंतपणे आरोपींनी पाण्यामध्ये फेकून दिलं. दोन्ही आरोपींना पोलिसांनी अटक केली आहे. त्यांनी गुन्ह्याची कबुली दिली आहे.”
ज्यांच्या जीवावर कुटुंब सोडलं त्यांनीच धोका दिला
या महिलेचे वडील परदेशात नोकरीला आहेत. आपला शेजारी आणि घरमालक असणाऱ्या गजेंद्र दगडखैर याच्या जिवावर आपण कुटुंब इथं ठेवून जात असल्याचं ते सांगत होते. तो असं काही करु शकेल असं वाटलंच नसल्याचं त्यांचं म्हणणं आहे.
ते म्हणाले, "आम्ही त्यांच्याच घरात भाडेकरु म्हणून रहातो. मी परदेशात कामाला आहे. मी यायचो तेव्हा त्यांची भेट घेत होतो. मुलांकडे लक्ष द्या म्हणून सांगायचो. 'हो दादा...आम्ही आहोत ना' असं ते म्हणायचे. मी भावासारखा विश्वास ठेवला त्यांच्यावर. त्यांनीच माझा गळा कापला. माझ्या नातवांना मारुन टाकलं.”
रम्यान मुलीसोबत नातवंडांचाही जीव गेल्याने तिच्या आईलाही धक्का बसला आहे. आरोपींना कडक शिक्षा व्हावी अशी मागणी त्या करत आहेत.
त्यांनी म्हटलं की, "आमच्यासोबत विश्वासघात झाला आहे. दोन लहान मुलं होती. त्यांना नदीत फेकलं. असं कसं करु शकतो तो. त्या माणसाला शिक्षा झाली पाहिजे. अशी शिक्षा करा की त्याने परत असं काही करु नये.”
दरम्यान, या महिलेसह तिच्या मुलांच्या मृतदेहाचा पोलिस शोध घेत आहेत. घटना घडून दोन आठवडे
झाल्याने मृतदेह सापडण्यामध्ये अडचणी येत असल्याचं पोलिसांचं म्हणणं आहे.