दौंड: नदी पात्रात आढळले एकाच कुटुंबातील 7 जणांचे मृतदेह, मृतात लहान मुलांचाही समावेश
बुधवार, 25 जानेवारी 2023 (09:41 IST)
दौंड तालुक्यातील पारगावमधील भीमा नदीच्या पात्रात ठराविक अंतराने 7 मृतदेह सापडल्याने खळबळ उडाली आहे. नदी पात्रात आढळलेल्या या मृतदेहांमागचं कारण मात्र अद्यापही स्पष्ट झालेलं नाही.
मृतांमध्ये दोन पुरुष, दोन महिला आणि तीन लहान मुलांचा समावेश आहे. पोलीस मृतदेहाची ओळख पटवू शकले आहेत.घटनेचं गांभीर्य लक्षात घेऊन पुणे ग्रामीण पोलीस अधीक्षक अंकित गोयल यांनी भीमा नदी पात्रात घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली.
नदीच्या परिसरात पोलीस आणि पुणे महानगरपालिकेची रेस्क्यू टीम कडून शोध मोहीम सुरू होती.
भीमा नदीच्या पात्रात 18 जानेवारीला एका महिलेचा मृतदेह आढळला. 20 जानेवारीला एका पुरुषाचा मृतदेह मिळाला.
पुढच्या दिवशी आणखी एका महिलेचा तर त्याच्या पुढच्या दिवशी आणखी एका महिलेचा मृतदेह आढळल्याने खळबळ उडाली.
24 तारखेला तीन लहान मुलांचे मृतदेह आढळल्याने याप्रकरणाचं गूढ वाढलं. 4 दिवसांच्या अंतरात 7 मृतदेह सापडले.
ज्यांचे मृतदेह आढळले ती सगळी माणसं बीड आणि उस्मानाबाद जिल्ह्यातील असल्याचं स्पष्ट झालं आहे. मोहन पवार हे आपली पत्नी, मुलगी, जावई आणि तीन नातवंडं यांच्यासह नगर जिल्ह्यातील पारनेर तालुक्यातील निघोज इथे राहत होते. मोलमजुरीचं काम करुन हे कुटुंब उदरनिर्वाह करत होतं.
सातपैकी चार मृतदेहांचं शवविच्छेदन झालं असून या चौघांचा पाण्यात बुडून मृत्यू झाल्याचं स्पष्ट झालं आहे. चारही मृतदेहांवर कोणत्याही स्वरुपाच्या जखमा नसल्याचंही पोलिसांनी स्पष्ट केलं.
पोलिसांनी अकस्मात मृत्यू म्हणून नोंद केली आहे पण एवढ्या सगळ्या लोकांचा मृत्यू कसा झाला, यामागे अपघात, घातपात नक्की काय कारण आहे याचा पोलीस शोध घेत आहेत.