वसुंधरा प्रकल्पाला नागरिकांचा विरोध, टेकडी वाचविण्यासाठी मनसे देखील रस्त्यावर

सोमवार, 11 ऑक्टोबर 2021 (08:35 IST)
पुणे शहरातील तळजाई टेकडीवर सकाळच्या वेळेत शेकडो नागरिक व्यायाम करण्यास जात असतात. मात्र त्या टेकडीवर जैववैविधता वसुंधरा प्रकल्प केला जाणार आहे. या प्रकल्पास नागरिकांनी विरोध दर्शविला असून आता टेकडी वाचविण्यासाठी मनसे अध्यक्ष राज ठाकरे हे देखील रस्त्यावर उतरले आहेत. त्या पार्श्वभूमीवर २४ ऑक्टोबर रोजी राज ठाकरे टेकडीला भेट देणार आहेत.
 
आगामी महापालिका निवडणूक लक्षात घेता अनेक राजकीय पक्षांच्या नेत्यांचे पुणे शहरात दौरे वाढले आहेत. त्यामध्ये मागील तीन महिन्यामध्ये राज ठाकरे यांनी पुण्याचा साधारण आठ वेळा दौरा केला आहे. त्या दरम्यान नव्या आणि जुन्या पदाधिकारी कार्यकर्ते यांच्याशी संवाद साधून पक्ष बांधणी करण्याचा प्रयत्न करताना ते दिसत आहेत. यामुळे मनसैनिकांमध्ये चांगलेच नवचैतन्य निर्माण झाले आहे. तर दोनच दिवसांपूर्वी राज ठाकरे हे पुण्यात आले होते. त्यावेळी नव्याने नियुक्त झालेल्या पदाधिकाऱ्यांना नियुक्ती पत्र देऊन त्यांच्याशी संवाद देखील साधला. त्यानंतर आता तळजाई टेकडीवर १०७ एकरात नव्याने होऊ घातलेल्या नियोजित जैववैविधता वसुंधरा प्रकल्पाला टेकडीवर दररोज येणार्‍या हजारो नागरिकांनी अगोदरच विरोध दर्शवला असताना. यामध्ये मनसेने उडी घेतली असून त्या प्रकल्पांला विरोध दर्शवला आहे.
 
या पार्श्वभूमीवर राज ठाकरे २४ ऑक्टोबर रोजी तळजाई टेकडीला भेट देणार आहेत. तिथे भूमिका जाहीर करणार आहेत. 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती