पुणे : १८ तासानंतर एमपीएससीची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे. पुण्यामध्ये कालपासून विद्यार्थ्यांनी आंदोलन सुरु केले होते. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या भेटीच्या आश्वासनानंतर अलका टॉकीज चौकामध्ये सुरु असलेले आंदोलन विद्यार्थ्यांकडून स्थगित करण्यात आले आहे. आज (दि. १४) पाच विद्यार्थ्यांचे शिष्टमंडळ पुण्यामध्ये मुख्यमंत्र्यांची भेट घेणार आहे. दरम्यान, आंदोलन स्थगित म्हणजे स्वल्पविराम असून पूर्णविराम नाही अशा भावना विद्यार्थ्यांनी व्यक्त केल्या आहेत.
दरम्यान, यूपीएससीच्या धर्तीवर नवीन अभ्यासक्रम यावर्षी लागू न करता तो २०२५ पासून लागू करावा या मागणीसाठी हे आंदोलन करण्यात आले होते. आज मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस हे पुणे दौऱ्यावर आहेत. त्यामुळे हे आंदोलक विद्यार्थी आज त्यांची भेट घेणार आहे. त्यामुळे यावर आज काही तोडगा निघणार का? हे पाहणे महत्त्वाचे असणार आहे.
पुण्यामधील अलका टॉकी चौकामध्ये विद्यार्थ्यांचे गेल्या १८ तासापासून आंदोलन सुरु होते. आंदोलक विद्यार्थ्यांना पोलिस सातत्याने समजवण्याचा प्रयत्न करत होते. तसेच आज उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस पुण्यामध्ये येणार आहेत, त्यांना तुम्ही एक शिष्टमंडळ घेऊन भेटण्याचा प्रयत्न करा असे देखील पोलिसांनी विद्यार्थ्यांना सांगितले होते. परंतु, तरी देखील विद्यार्थ्यांनी रात्रीच्या एवढ्या थंडीमध्ये आंदोलन सुरुच ठेवले होते. जवळपास ७०० विद्यार्थी रस्त्यावर बसून होते. परंतु, पोलिसांच्या आवाहनानंतर आता विद्यार्थ्यांनी आंदोलन स्थगित केले आहे.
“या” शहरात सुरु होते आंदोलन
जोपर्यंत आयोग नवा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करणार असल्याची मागणी पूर्ण करुन नोटीफिकेशन काढत नाही तोपर्यंत आंदोलन सुरु राहणार असल्याचे विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. या संदर्भात उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आयोगाला नोटीफिकेशन काढण्याचे आदेश द्यावे, असे देखील विद्यार्थ्यांनी म्हटले आहे. एमपीएसीने राज्यसेवा परीक्षेचा नवीन अभ्यासक्रम २०२३ पासून लागू करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र हा अभ्यासक्रम २०२५ पासून लागू करावा अशी या विद्यार्थ्यांची मागणी आहे. याच मागणीसाठी पुणे, मुंबई, नाशिक, नागपूर, औरंगाबादसह राज्यामधील प्रमुख शहरात या विद्यार्थ्यांनी आंदोलन केले होते.