गाडीचा आरसा फुटल्याची भरपाई मागितली म्हणून तरुणाचा खून

शुक्रवार, 15 डिसेंबर 2023 (09:30 IST)
गाडीचा आरसा फुटला म्हणून नुकसान भरपाई मागणाऱ्या तरुणाचा खून होण्याचा प्रकार पुण्यात घडला आहे.
चारचाकी वाहनाला धक्का लागून झालेल्या नुकसानाची भरपाई मागण्यासाठी गेलेल्या तरुणाचा धारदार शस्त्राने मारहाण करुन खून करण्यात आला आहे. याप्रकरणी पोलिसांनी दोन संशयिताना ताब्यात घेतले आहे.
 
30 वर्षांचा अभिषेक भोसले फर्निचर तयार करण्याचे काम करत होता. बुधवारी संध्याकाळी सहाच्या सुमारास तो आपल्या चारचाकी वाहनामधून हडपसर मधल्या शेवाळवाडी इथल्या महादेव मंदिरापासून जात होता.
 
त्यावेळी त्याच्या मोटारीला फुरसुंगीचा रहिवासी असणाऱ्या विलास सकट याची गाडी घासली. त्यामध्ये अभिषेकच्या गाडीच्या आरश्याचे नुकसान झाले. त्यानंतर अभिषेक आणि विलास यांचा वाद झाला.
 
या वादानंतर रात्री सव्वादहाच्या सुमारास अभिषेक आणि विलास नुकसानभरपाई बाबत चर्चा करण्यासाठी भेटले. त्यावेळी या दोघांमध्ये पुन्हा वाद झाला.
 
या वादातून सकट यांच्यासह सात ते आठ जणांनी अभिषेकच्या तोंडावर आणि डोक्यावर धारदार शस्त्राने माहराण केली. या मारहाणीमध्ये अभिषेकचा मृत्यू झाला.
 
पोलिसांनी काय सांगितलं?
याबाबत बीबीसी मराठीशी बोलताना हडपसर पोलीस स्थानकाचे पोलीस निरिक्षक रविंद्र शेळके यांनी सांगितले, “अभिषेक भोसले आणि सकट यांची गाडी घासली तेव्हा भोसलेच्या कारच्या आरश्याचं नुकसान झालं होतं. त्याची भरपाई करावी अशी मागणी भोसलेनी केली होती.
 
"त्याबाबत चर्चा करण्यासाठी जेव्हा हे दोघे भेटले तेव्हा हा प्रकार झाला आहे. त्यांची पूर्वीची कोणतीही ओळख नव्हती. झालेल्या भांडणांमधूनच हा प्रकार झाला आहे.”
 
हडपसर पोलिसांनी या प्रकरणी गुन्हा दाखल केला आहे. तसेच दोन संशयितांना ताब्यात घेतलं आहे. इतर आरोपींचा शोध सुरु असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

Published By- Priya Dixit
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती