पुण्यात H3N2 व्हेरियंटचे 22 रुग्ण आढळले

मंगळवार, 14 मार्च 2023 (22:30 IST)
इन्फ्लुएंझा ए विषाणूचा उपप्रकार असलेल्या ‘H3N2’ या विषाणूचे पुणे शहरात 22 रुग्ण आढळून आले आहेत. सर्वाधिक रुग्ण हे 19 ते 60 वयोगटातील आहेत. त्यामुळे पुणेकरांची धाकधूक आता वाढली आहे. राष्ट्रीय विषाणू विज्ञान संस्थेनं यासंदर्भात अहवाल दिला आहे.
 
पुण्याच्या नायडू हॉस्पिटलमध्ये तपासणीसाठी आलेल्या 109 संशयित रूग्णांचे नमुने एनआयव्हीकडे तपासणीसाठी पाठवण्यात आले होते. जानेवारी ते मार्च या दरम्यान 22 पुणेकरांना याची बाधा झाली आहे. एनआयव्हीच्या अहवालावरुन पुण्यात या आजाराची साथ मोठ्या प्रमाणात पसरल्यावर शिक्कामोर्तब झाले आहे. H3N2 हा व्हायरल फ्लू असून, हा विषाणू H1N1 विषाणूचे म्युटेशन म्हणजे बदललेला प्रकार आहे. पुण्यात आढळलेल्या रुग्णांची लक्षणे ही सर्वसामान्य फ्लू सारखीच दिसून येत आहेत. त्यामुळे H3N2 संदर्भात आता खासगी रूग्णालयांनाही सूचना देण्यात आल्या आहेत.
 
दरम्यान, महाराष्ट्रातही ‘H3N2’ चे रुग्ण वाढत असल्याने चिंता व्यक्त होत आहे. सोमवारीच H3N2 विषाणू संदर्भात आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली अधिकाऱ्यांची बैठक पार पडली. या बैठकीत राज्यातील सर्व आरोग्य यंत्रणांना सतर्क राहण्याचे आदेश सावंत यांनी दिले. तसेच ठाणे, मुंबई, पुणे या भागात जास्तीत जास्त लक्ष ठेवण्याच्या सूचना त्यांनी केल्या होत्या.
 
Edited By -Ratnadeep Ranshoor

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती