1 मे ठरणार राज्याच्या राजकारणात हॉट! राज यांची औरंगाबादेत तर उद्धव यांची पुण्यात जाहीर सभा

गुरूवार, 28 एप्रिल 2022 (07:38 IST)
यंदाचा महाराष्ट्र दिन (1 मे) राज्याच्या राजकारणात अतिशय हॉट ठरणार असल्याचे चित्र आहे. कारण, राज्य सरकारला 3 मेचा अल्टीमेटम देणारे मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची 1 मे रोजी औरंगाबाद मध्ये जाहीर सभा आहे. आता शिवसेना पक्ष प्रमुख आणि मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचीही त्याच दिवशी म्हणजे 1 मे रोजी पुण्यामध्ये जाहीर सभा होणार आहे. 
 
मशिदींवरील भोंग्यांचा प्रश्न उपस्थित करुन राज ठाकरे यांनी संपूर्ण राज्यात खळबळ उडवून दिली आहे. याप्रकरणी राज्य सरकारने सर्वपक्षीय बैठकही घेतली आहे. राज यांच्या समर्थनार्थ आणि विरोधात प्रतिक्रीया उमटत आहेत. त्यातच राज यांनी 1 मे रोजी औरंगाबादमध्ये जाहीर सभा घेण्याचे निश्चित केले आहे. अद्याप या सभेला परवानगी मिळालेली नाही.
 
त्यातच आता उद्धव ठाकरे यांनीही जाहीर सभा घेण्याचे निश्चित केले आहे. त्यांची सभा 1 मे रोजीच पुण्यात होणार आहे. याच सभेद्वारे उद्धव हे राज यांना अतिशय जोरदार प्रत्युत्तर देण्याची चिन्हे आहेत. विशेष म्हणजे, उद्धव यांच्या मानेवर शस्त्रक्रिया झाल्यानंतर त्यांची ही पहिलीच जाहीर सभा असणार आहे. सध्या त्या खुप कमी प्रमाणात सार्वजनिक कार्यक्रमांमध्ये उपस्थित असतात. त्यावरुन विरोधकांकडून मोठी टीका होत असते. लवकरच मी राज्याचा दौरा करणार असल्याचे उद्धव यांनी यापूर्वीच सांगितले आहे. त्यास आता ते 1 मे पासून सुरुवात करणार असल्याचे सांगितले जात आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती