आयआयटी-जेईईच्या ही परीक्षा सर्वात कठिण परीक्षांमध्ये गणली जाते. अशा परिस्थितीत दहावीची परीक्षा उत्तीर्ण केल्यानंतरच या परीक्षेचा अभ्यास सुरू करणे योग्य ठरेल. दहावी उत्तीर्ण झाल्याच्या काळात एकतर विद्यार्थी उत्साही असतो आणि आव्हान स्वीकारण्याची त्याची तयारी असते.
विद्यार्थ्याच्या मुलभूत संकल्पना स्पष्ट असतील तर त्याला फार अडथळे येत नाहीत. त्यासाठी आवश्यक आहे अचूक रणनीती आणि काही छोट्या-छोट्या गोष्टीवर लक्ष देण्याची. त्यामुळे या परीक्षेसाठी आधीच एक रणनीती आखा आणि खाली दिलेल्या गोष्टींवर लक्ष द्या....
आत्मविश्वास:
सुरवात नेहमी सकारात्मक दृष्टिकोण आणि आत्मविश्वासाने करावी. परीक्षेसंबंधात कुठलीही द्विधा मनस्थिती ठेवू नका. 'मी सर्व करू शकतो' असे मानून स्वतः:वर विश्वास ठेवा.
तयारीः
या परीक्षेची तयारी अकरावीतच सुरू करा. पहिल्या शंभरात येणार्या विद्यार्थ्यांमध्ये अशाच विद्यार्थ्यांची संख्या जास्त असते.
नेमके मार्गदर्शन:
परीक्षेच्या तयारीसाठी कोचिंग क्लास आणि पत्राद्वारे देण्यात येणार्या अभ्यासक्रमाची निवड करताना आधी त्यासंबंधी संपूर्ण माहिती मिळवा. त्यानंतरच निवड करा.
लक्ष केंद्रीत करा:
एकाबरोबर बरेच कोर्स किंवा पुस्तकांपेक्षा एखाद्या अनुभवी विद्यार्थ्यांचा सल्ला घेऊन कोणत्याही एका कोर्सपासून तयारीला लागा. त्यामुळे तुमचा गोंधळ होणार नाही.
अभ्यासाचे वेळापत्रक बनवा:
कोणत्याही परीक्षेची तयारी करताना आधी अभ्यासाचे वेळापत्रक बनवा आणि आपले ध्येय केंद्रित ठेवून या वेळापत्रकाची अंमलबजावणी करायला सुरुवात करा.
आपले कच्चे दुवे ओळखा:
जो विषय किंवा मुद्दा कठीण वाटतो, त्यावर अधिक लक्ष देऊन आपला कच्चा दुवा पक्का करण्याचा प्रयत्न करा.
गुणवत्तेकडे लक्ष द्या :
तुम्ही किती प्रश्न सोडवीत आहात यापेक्षा तुम्ही ते कसे सोडवीत आहात हे जास्त महत्त्वाचे आहे. त्यामुळे असे प्रश्न सोडवा जे कठीण असतील. कोणताही प्रश्न सोडून देण्यापेक्षा तो सोडविण्याचा प्रयत्न करा.
स्वतःचीच परीक्षा घ्या:
एखाद्यावेळी स्वत:चीच परीक्षा घ्या. त्यामुळे तुम्ही किती पाण्यात आहात याचा अंदाज येईल. तुम्ही स्वतः:ची जितकी जास्त परीक्षा घ्याल तितके ते तुमच्यासाठीच हितकारक ठरेल.
या सोबतच आपल्या मित्रांशी यासंबंधी चर्चा करीत राहा आणि तयारीच्या आधुनिक तंत्राची माहिती ठेवा.