आठव्या इयत्तेतील विद्यार्थिनीने लिहिले संस्कृत नाटक...

वेबदुनिया

मंगळवार, 4 फेब्रुवारी 2014 (14:47 IST)
WD
येथील लोकमान्य विद्यानिकेतन मधील आठव्या इयत्तेतील स्वरदा सुश्रुत जळूकर या विद्यार्थिनीने "पाणी वाचवा" या विषयावर संस्कृत भाषेत नाटक लिहिले आहे.

विद्यालयातील इयत्ता आठवीच्या संस्कृत विषयाच्या शिक्षकांनी संस्कृत भाषेविषयी विद्यार्थ्यांमध्ये आवड निर्माण होण्याच्या उद्देशाने वर्गातील विद्यार्थ्यांचे विविध गट तयार करून संस्कृत नाटक करण्याचे आवाहन नुकतेच केले होते. या आवाहनास प्रतिसाद म्हणून एका गटाने उपलब्ध 'त्रिवर्ण ध्वज:' या विषयावर तर इतर गटांनी एकलव्य, वृद्ध आदर, वसंत ऋतू आदी विषयांवर नाटक सादर केले. स्वरदा जळूकर हिने सामाजिक जिव्हाळ्याचा विषय असलेले "पाणी वाचवा" हे नाटक प्रथम हिंदी भाषेत लिहिले. यानंतर "जलस्य संरक्षण" संस्कृत भाषेत लिहून काढले. काही संवाद तयार करताना आलेल्या अडचणींना सोडविण्यासाठी शाळेच्या संस्कृत विषयाच्या शिक्षिका सुविद्या गोखले व पुणे येथील संस्कृत तज्ञ व शिक्षिका ज्योती बनसोड यांचे मार्गदर्शन लाभले. पाच पात्रांचा समावेश असलेल्या आणि दहा मिनिटांच्या या नाटकाचे कथानक - पाण्याचा सतत अपव्यय करणार्‍या श्रीमंत मुलीस तिच्याच मैत्रिणींनी पाणी वाचवून पाण्याचे पटवून दिलेले महत्त्व, यात गावात अचानक झालेल्या पाणीटंचाईमुळे सहाजिकच निसर्गाची सुद्धा लाभलेली साथ, आणि नंतर पाण्याचा एक-एक थेंब वाचवणारी मुलगी...! असे सादरीकरण उत्कृष्ट रितीने करण्यात आले आहे.

वेबदुनिया वर वाचा