मुशर्रफ यांचे भवितव्य पूर्वसुरींसारखेच

एएनआय

मंगळवार, 19 ऑगस्ट 2008 (13:21 IST)
पाकिस्तानात आतापर्यंत चार लष्करशहांनी देशाची सत्ता हातात घेतली. त्यांच्यात काही साम्यही आहे. या सगळ्यांनी सत्ता हातात घेतली तेव्हा देशाची अर्थव्यवस्था राजकारण्यांनी डबघाईला आणून ठेवली होती. त्याचबरोबर अयूब खान, याह्याखान, झिया उल हक व परवेझ मुशर्रफ या चारही लष्करी हुकुमशहांपैकी कुणीही महाभियोगाला सामोरे गेले नाही. आपल्या पदाची सूत्रे त्यांनी स्वतःहून खाली ठेवली, असे डेली टाईम्सच्या वृत्तात म्हटले आहे.

अयूब खान हे पाकिस्तानचे पहिले लष्करी हुकुमशहा. त्यांनी २७ ऑक्टोबर १९५८ पंतप्रधान इस्कंदर मिर्झा यांना पदच्युत करत सत्ता ताब्यात घेतली. देशाच्या राजकारणात लष्कराच्या हस्तक्षेपाचे हे पहिलेच उदाहरण होते. अयूब यांनी अकरा वर्षे सत्ता उपभोगली. त्यांच्या काळात मर्यादीत प्रमाणात लोकशाही होती. औद्योगिक सुधारणा, कृषी विकासाला त्यांनी उत्तेजन दिले. कालव्यांचे जाळे बांधले. पण भारताशी युद्ध करण्याची खुमखुमीही त्यांनी १९६५ च्या युद्धात भागवून घेतली. त्यात पराभवही पाहिला.

कारकिर्दीच्या शेवटच्या वर्षांत अयूब यांनी आपल्या वारसदारांसंदर्भात चर्चा सुरू केली. त्यासाठी मौलाना भाषानी, झुल्फिकार अली भुट्टो यांची नावे चर्चेत होती. पण परिस्थिती इतकी हाताबाहेर गेली की १९६० मध्ये अयूब यांना सत्ता सोडण्याशिवाय पर्याय राहिला नाही. त्यांनी २५ मार्च १९६९ ला राजीनामा दिला.

त्यानंर लष्करशहा याह्या खान सत्तेवर आले. त्यांनी आल्या आल्या पाकिस्तानात मार्शल लॉ लागू केला आणि ते देशाचे अध्यक्ष बनले. त्यांच्या काळात महत्त्वाची गोष्ट घडली ती म्हणजे त्यांनी १९७० मध्ये निवडणुका घेतल्या. त्यात पाकिस्तान पीपल्स पार्टीने पश्चिम पाकिस्तानात बहूमत मिळवले, तर अवामी लीगने पूर्व पाकिस्तानात. सत्ता हस्तांतरण होत असतानाच पाकिस्तानने भारताची पुन्हा एकदा कुरापत काढली आणि युद्ध पेटले. त्यात भारताने पाकिस्तानचा पराभव केला. शिवाय बांगलादेश वेगळा केला. हा पराभव पाकिस्तानी जनतेला सहन झाला नाही आणि त्या दबावापोटीच याह्या खान यांनी राजीनामा देऊन २० जिसेंबर १९७१ ला सत्ता भुट्टो यांच्याकडे सुपूर्द केली.

भुट्टो यांनी १९७६ मध्ये झिया उल हक यांना लष्करप्रमुख म्हणून नेमले. पण झिया यांनी भुट्टो यांची सत्ता उलथवून ५ जुलैला १९७७ ला सत्ता हातात घेतली. मग देशात तिसरा मार्शल लॉ लागू केला. झिया यांच्या काळात अफगाण युद्ध झाले.

त्यानंतर मुशर्रफ यांनी १२ ऑक्टोबर १९९९ ला नवाझ शरीफ यांची सत्ता उलथवली. पण त्यांनी मार्शल लॉ लागू केला नाही. ते देशाचे प्रमुख कार्यकारी अधिकारी ठरले. त्यांनी हे पद खास स्वतःसाठी निर्माण केले.

वेबदुनिया वर वाचा