मुशर्रफ दहशतवादा विरोधात लढले- बुश

अमेरिकेने दहशतवादा विरोधात पुकारलेल्या युद्धात मुशर्रफ यांनी समर्पक साथ दिल्याचे स्पष्ट करत अमेरिकेचे राष्ट्राध्यक्ष जॉर्ज बुश यांनी पाकचे मावळते राष्ट्राध्यक्ष मुशर्रफ यांची स्तुती केली आहे.

मुशर्रफ यांनी घेतलेल्या काही खंबीर निर्णयामुळेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तानच्या काही भागातील दहशतवाद मोडून काढता आल्याचे बुश यांनी स्पष्ट केले. त्यांनी स्वतः: देशासाठी पदाचा त्याग केल्याने त्यांचे कौतुक करावे तेवढे थोडेच असल्याचे बुश म्हणाले.

बुश यांच्या पाठोपाठ अमेरिकेच्या परराष्ट्रमंत्री कोंडालिजा राईस यांनीही मुशर्रफ यांच्यावर स्तुती सुमने उधळली आहेत. काही दिवसांपूर्वी राईस यांनी मुशर्रफ यांना अमेरिकेत आश्रय देणे अशक्य असल्याचे म्हटले होते. यानंतर आता त्यांनीही मुशर्रफ यांनी दिलेल्या आपल्या पदाच्या राजीनाम्यावर खूश होत, त्यांची तोंडभरून स्तुती केली आहे.

मुशर्रफ यांच्यामुळेच अफगाणिस्तान आणि पाकिस्तान दरम्यान सीमावर्ती भागात दहशतवादाचे उच्चाटन करण्यात उभय देशांना काही प्रमाणात यश मिळाल्याचे राईस म्हणाल्या.

वेबदुनिया वर वाचा