पॅरिस ऑलिंपिकमध्ये रशियन खेळाडूंनी पदक जिंकलं तरी त्यांच्या देशाचा झेंडा का फडकणार नाही?
शुक्रवार, 26 जुलै 2024 (14:50 IST)
फ्रान्सची राजधानी पॅरिस ऑलिंपिकसाठी सज्ज झाली आहे. अवघ्या काही तासांत ऑलिंपिकचा उदघाटन सोहळा रंगणार आहे.या स्पर्धेसाठी सुरक्षा व्यवस्था ही फ्रान्स सरकारसाठी मुख्य चिंतेची बाब बनली आहे. ऑलिंपिक नंतर पॅरिसमध्येच पॅरालिंपिकचं आयोजन केलं जाईल.
या स्पर्धा कशा असतील, जाणून घ्या.
पॅरिसमध्ये ऑलिंपिकचं आयोजन 26 जुलै ते 11 ऑगस्ट 2024 या दरम्यान असणार आहे. या क्रीडास्पर्धेत 329 क्रीडाप्रकारांत एकूण 10,500 खेळाडू सहभागी होतील.
त्यानंतर पॅरालिंपिकचं आयोजन 28 ऑगस्ट ते 8 सप्टेंबर दरम्यान केलं जाणार आहे. यात 549 क्रीडाप्रकारांत 4,400 खेळाडू भाग घेणार आहेत.पॅरिस ऑलिंपिकमध्ये एकूण 206 देश आणि पॅरालिंपिकमध्ये 184 देशांचा सहभाग असणार आहे.ऑलिंपिक क्रीडास्पर्धेदरम्यान पॅरिसमध्ये 1.5 कोटी पर्यटक येण्याची अपेक्षा आहे.
उद्घाटन सोहळा कसा असेल?
पॅरिस ऑलिंपिकमध्ये फुटबॉल, तिरंदाजी, रग्बी आणि हँडबॉलचे काही सामने 24 जुलैपासून सुरू झाले आहेत.पण स्पर्धेचा मुख्य उद्घाटन सोहळा शुक्रवारी 26 जुलैला भारतीय वेळेनुसार रात्री 11 वाजण्याच्या सुमारास सुरू होईल.दरवेळी स्टेडियममध्ये खेळाडूंची परेड असते, मात्र यावेळी सेन नदीच्या पात्रात बोटींवरून खेळाडूंची परेड निघेल.
16 एप्रिल 2024 रोजी ग्रीसमध्ये ऑलिंपिक खेळांची ज्योत प्रज्वलित केली गेली होती.ही ज्योत प्रज्वलित होणे म्हणजे यावेळच्या ऑलिंपिक खेळांच्या उत्सवाची सुरुवात झाल्याची औपचारिक घोषणाच मानली जाते. ज्योत प्रज्वलित झाल्यानंतर मशाल पेटवून ती यजमान देशात नेली जाते.त्यानुसार फ्रान्समधल्या अनेक ऐतिहासिक ठिकाणांना भेट देऊन आता 26 जुलैच्या उद्घाटन समारंभात दाखल होईल.
ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकचं आयोजन कुठे केलं जाईल?
मुख्य अॅथलेटिक्स स्पर्धांचं आयोजन पॅरिस शहरातल्या स्टेड द फ्रान्स या ऐतिहासिक स्टेडियममध्ये केलं जाणार आहे.
ऑलिंपिकच्या 15 तर पॅरालिंपिकच्या 11 क्रीडाप्रकारांचं आयोजन पॅरिसच्या मध्यवर्ती भागात केलं जाणार आहे. उदाहरणार्थ- पाँट द'आएना या रस्त्यावर रोड सायकलिंग स्पर्धा घेतल्या जाणार आहेत.
मॅरेथॉन स्पर्धेची सुरूवात 'ओतेल द व्हिल' पासून होईल आणि शेवट लेज आनवालिड इथे होईल.
ऑलिंपिकसाठी सुरक्षाव्यवस्था
ऑलिम्पिकसाठी फ्रान्सची सुरक्षा दलांनी काय तयारी केली आहे? हा देखील एक महत्त्वाचा प्रश्न आहे. याबद्दलची तयारी कशी आहे ते आता आपण पाहू.
ड्रोन हल्ल्यांसारख्या धोक्यांची चिंता असल्यामुळं फ्रान्स सरकारनं ऑलिम्पिक उद्घाटन सोहळ्यासाठी उपस्थित राहणाऱ्या प्रेक्षकांच्या संख्येत कपात केली आहे.
ऑलिम्पिक उद्घाटनासाठी सुरक्षा व्यवस्था राखण्यासाठी फ्रान्स सरकार जवळपास 20,000 सैनिक आणि 40,000 पोलिस कर्मचाऱ्यांचा वापर करणार आहे. त्याशिवाय इतर देशांमधून जवळपास 2,000 सैनिक आणि पोलिस कर्मचारी मदतीला असणार आहेत.
या खेळात सहभागी असणाऱ्या खेळाडू, ऑलिम्पिक खेळाच्या आयोजन स्थळांच्या जवळपास राहणारे निवासी, वैद्यकीय कर्मचारी आणि स्वयंसेवक इत्यादी जवळपास दहा लाख लोकांचं स्क्रिनिंग सुरक्षा व्यवस्थेकडून केलं जाणार आहे.
फ्रान्सचे पंतप्रधान, गॅब्रिएल अटाल म्हणाले की ''गुप्तहेर संस्थांनी 2024च्या सुरूवातीलाच इस्लामिक दहशतवाद्यांकडून फ्रान्सविरोधात केल्या जाणाऱ्या दोन घातपाती कट उघडकीस आणले आहेत. दहशतवादी हल्ल्यांचा धोका खरोखरच आहे आणि तो अत्यंत गंभीर स्वरूपाचा आहे.''
ऑलिंपिकमध्ये नवे खेळ
पॅरिस ऑलिंपिकमध्ये केवळ एका नव्या खेळाचा समावेश झाला आहे आणि तो खेळ आहे ब्रेकिंग.
ब्रेकिंग हा एक प्रकारचा डान्स आहे, ज्याचा उगम न्यूयॉर्कच्या ब्राँक्स भागात 1970 च्या दशकात झाला होता. पण केवळ एक नृत्याचा प्रकार न राहता आता हा एक क्रीडाप्रकारही बनला आहे.
एरवी सिंक्रोनाईज्ड स्विमिंग किंवा आर्टिस्टिक स्विमिंग या नजाकतदार खेळाचे अनेक चाहते आहेत. पॅरिसमध्ये पहिल्यांदाच पुुरुषांच्या आर्टिस्टिक स्विमिंगचा समावेश करण्यात आला आहे.
ऑलिंपिक मॅस्कॉट
दरवेळी ऑलिंपिकमध्ये नवा मॅस्कॉट लक्ष वेधून घेतो. पॅरिस ऑलिंपिकच्या मॅस्कॉटचं नाव आहे फ्रिज (Phryge).
फ्रान्समधल्या परंपरेचा भाग असलेल्या एका टोपीवरून हा मॅस्कॉट तयार करण्यात आला आहे.
ही टोपी, फ्रिजियन हॅट, हे फ्रान्समध्ये राज्यक्रांती आणि स्वातंत्र्याचं प्रतिक मानली जाते.
पॅरिस ऑलिंपिकचं बोधवाक्य आहे "Alone we go faster, but together we go further." म्हणजे एकट्यानं आपण वेगात जाऊ शकतो, पण एकत्र निघालो तर दूरवर जाऊ शकतो.
ऑलिंपिकमध्ये रशियावर बंदी घालण्यात आली आहे का?
रशिया आणि बेलारुस या दोन्ही देशांना पॅरिस ऑलिंपिकमध्ये त्यांचे खेळाडू पाठवता येणार नाहीत. कारण रशियाने युक्रेनवर हल्ला केला आहे आणि बेलारुस रशियाला मदत करतो आहे.
त्यामुळे दोन्ही देशांवर बंदी घालण्यात आली आहे. पण रशिया आणि बेलारूसच्या स्पर्धकांना तटस्थ खेळाडू म्हणून ऑलिंपिकमध्ये सहभागी होता येईल.
मात्र त्यासाठी त्यांच्यावर कडक निर्बंध आहेत. त्यामुळे जेमतेम 15 रशियन खेळाडू या क्रीडास्पर्धेत खेळतील.
पण या स्पर्धकांना ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्याच्या परेडमध्ये भाग घेता येणार नाही. त्यांची राष्ट्रगीतं वाजवली जाणार नाहीत. तसंच जरी या खेळाडूंनी पदकं जिकंली तरी त्यांच्या देशांचे झेंडे फडकावले जाणार नाहीत.
रशियन खेळाडूंना ज्या पद्धतीने वागवण्यात येणार आहे त्याबद्दल रशियानं नाराजी व्यक्त केली आहे. त्याचबरोबर रशियानं सप्टेंबर महिन्यात मॉस्को आणि येकातेरिनबर्ग इथं ''जागतिक मैत्री खेळां''ची घोषणा केली आहे.
लॉस एंजेलिस इथं उन्हाळी ऑलिंपिकमध्ये बहिष्कार घातल्यानंतर 1984 मध्ये त्यावेळच्या सोविएत युनियननं याच पद्धतीने स्पर्धेचं आयोजन केलं होतं.
फ्रान्सचे राष्ट्राध्यक्ष इमॅन्युएल मॅक्रॉन म्हणाले की पॅरिस ऑलिंपिकचं महत्त्व कमी करण्यासाठी रशियाकडून नकारात्मक प्रचार केला जातो आहे.
इस्रायलनं गाझा पट्टीवर लष्करी कारवाई केल्यामुळं त्या देशावरदेखील बंदी घातली जावी अशी मागणी केली जात होती.
पण आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समितीचे अध्यक्ष थॉमस बाक यांनी मात्र रशियाची मागणी धुडकावून लावली आहे आणि इस्रायल या स्पर्धेत सहभागी होणार असल्याचं सांगितलं आहे.
फ्रान्समध्ये ऑलिंपिक लोकप्रिय आहे का?
एका सर्व्हेनुसार पॅरिसमधील 44 टक्के नागरिकांना वाटतं की ऑलिंपिकचं आयोजन करणं ही वाईट बाब आहे. यातील अनेकजण या कालावधीत शहर सोडण्याचं नियोजन करत आहेत.
ऑलिंपिक स्पर्धेदरम्यान पॅरिसमधील बस आणि मेट्रोचे दर दुप्पट असणार आहेत.
ऑलिंपिक आणि पॅरालिंपिकमध्ये खेळाडूंंची निवासस्थानं असलेली वस्ती (अॅथलीट्स व्हिलेज) आणि नवीन केंद्र पॅरिसच्या उत्तर भागात आहेत. सीन-सेंट-डेनिस या नावानं ओळखला जाणारा हा परिसर फ्रान्समधील सर्वांत गरीब वस्त्यांपैकी एक आहे.
खेळांचं आयोजन होणाऱ्या ठिकाणा लगतच्या इमारतींमधून हजारो घुसखोरांना हुसकावून लावल्यानंतर सेवाभावी संस्थांनी तक्रार केली होती..
पॅरिसच्या मध्यवर्ती भागात जिथं खेळांचं आयोजन केलं जाणार आहे तो भाग लोकांनी फुलून गेलेला असणार आहे आणि त्यामुळंच त्या परिसरात वाहतुकीची कठोर बंधनं असणार आहेत.
ऑलिंपिक खेळांदरम्यान अनेक मेट्रो स्टेशन आणि रेल्वे स्टेशन बंद ठेवली जाणार आहेत.
''ऑलिंपिक काळात पॅरिस हे शहर असह्य असणार आहे. इथं पार्किंग करणं अशक्य होईल, कुठेही जाणं अशक्य होईल आणि कोणतीही गोष्ट करणं अशक्य होणार आहे,'' असं मत पॅरिसमधील एका रहिवाशानं बीबीसीशी बोलताना व्यक्त केलं.