पॅरिस ऑलिंपिकमध्ये खेळता यावं म्हणून खेळाडूने छाटलं स्वत:चं बोट

शनिवार, 27 जुलै 2024 (13:26 IST)
पॅरिस ऑलिंपिक स्पर्धेत भाग घेता यावा, यासाठी ऑस्ट्रेलियाच्या एका हॉकी खेळाडूने स्वत:चं बोट छाटल्याची घटना घडली आहे.
मॅट डॉसन असं या खेळाडूचं नाव आहे. पर्थ येथे एक आठवड्यापूर्वी प्रशिक्षणाच्या वेळी त्याच्या उजव्या हाताचं एक बोट दुखावलं होतं. त्या बोटावर शस्त्रक्रिया केली असती तर बरं व्हायला अनेक महिने लागले असते.त्यामुळे या 30 वर्षीय खेळाडूने ते संपूर्ण बोटच छाटण्याचा निर्णय घेतला.
 
मॅट डॉसन याची ही तिसरी ऑलिपिंक स्पर्धा आहे. या घटनेने त्याच्या टीममधील इतर खेळाडूंना आणि प्रशिक्षकाला प्रचंड धक्का बसला.
शनिवारी (27 जुलै) ऑस्ट्रेलिया आणि अर्जेटिना यांच्यात पहिला सामना होणार आहे. दुखापत झाल्यानंतरचा मॅटचा हा 16 वा दिवस आहे.
डॉसन म्हणाला की, ती बोटाची दुखापत इतकीं भीषण होतं की जेव्हा त्याने बोट चेंजिग रुममध्ये पाहिलं, तेव्हा तो बेशुद्ध पडला. त्याला वाटलं की आता ऑलिंपिक खेळण्याचं स्वप्न भंगलं.
 
त्याने थेट एका प्लॅस्टिक सर्जनचा सल्ला घेतला. त्यांनी सांगितलं की सर्जरी केली तरी ते बोट ठीक व्हायला खूप वेळ लागेल. ते पूर्वीसारखं काम करू शकेल की नाही शंकाच आहे. पण ते काढून टाकलं तर तो दहा दिवसात खेळायला जाऊ शकेल.
 
त्याच्या बायकोने असा कोणताही अघोरी निर्णय घेऊ नको म्हणून इशारा दिला होता. मात्र, डॉसन म्हणाला की, त्याच दिवशी दुपारी विचारपूर्वक हा निर्णय घेतला.
 
“माझं हॉकीतलं करिअर आता संपत आलं आहे. कदाचित हे माझं शेवटचं ऑलिंपिक असू शकतं. मला असं वाटलं की मी अजूनही चांगला खेळू शकतो आणि मी आता तेच करणार आहे,” असं डटसन पार्लेझ वॉस हॉकी पॉडकास्टमध्ये सांगत होता.
 
टीमचा कॅप्टन अरान झालेस्की म्हणाला की, त्याचा हा निर्णय ऐकून पूर्ण टीमच्या अंगावर काटा आला. मात्र तरीही ते त्याच्या पाठीशी उभे राहिले.
“आम्हाला काय विचार करायचा तेच कळत नव्हतं. मग आम्ही ऐकलं की तो हॉस्पिटलमध्ये गेला आणि बोटच छाटलं आहे. हे खरंतर फार रंजक होतं कारण इथे खेळता यावं म्हणून लोक त्यांचा हात किंवा पाय किंवा अगदी बोटाच्या एखादा भागाचा बळी देऊन टाकतात” पॅरिसमध्ये झालेल्या पत्रकार परिषदेत तो बोलत होता.
 
“मॅटला खरंच पैकीच्या पैकी गुण. तो पॅरिस मध्ये झोकून देणारा खेळाडू आहे. मी हे असं केलं असतं का मला माहिती नाही, फारच भारी,” असं त्याने ऑस्ट्रेलियाच्या सेव्हन न्यूज नेटवर्कला सांगितलं.
डॉसनला अशी दुखापत पहिल्यांदा झालेली नाही. 2018 च्या कॉमनवेल्थ स्पर्धेच्या आधी हॉकी स्टिक डोळ्याला लागल्यामुळे डोळा गमावण्याची वेळ त्याच्यावर आली होती.
 
तरीही तो ऑस्ट्रेलियासाठी खेळला. त्या स्पर्धेत संघाने सुवर्णपदक मिळवलं होतं. टोक्यो ऑलिंपिकमध्येही रौप्य पदकाची कमाई केली होती.
Published By- Priya Dixit 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती