स्वप्नील कुसाळेला कांस्य पदक, गावकऱ्यांचा आनंद गगनात मावेना

गुरूवार, 1 ऑगस्ट 2024 (15:11 IST)
पॅरिस ऑलिंपिकमध्ये 50 मीटर एयर रायफल नेमबाजीच्या फायनलमध्ये भारताचा नेमबाज स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं आहे. कोल्हापूरच्या स्वप्नीलने भारताला पॅरिस ऑलिंपिकमध्ये तिसरं पदक मिळवून दिलं आहे.
 
भारताला पहिल्यांदाच नेमबाजीमध्ये तीन पदकं मिळाली आहेत.
 
50 मीटर एयर रायफल नेमबाजीमध्ये चीनच्या नेमबाजाला सुवर्णपदक तर, युक्रेनच्या नेमबाजाला रौप्यपदक मिळालं, तर तिसऱ्या क्रमांकावर राहत स्वप्नील कुसाळेने कांस्यपदक पटकावलं.
 
या स्पर्धेच्या अंतिम फेरीपर्यंत पोहोचलेल्या स्वप्नीलने यापूर्वी 2022 साली एशियन गेम्समध्ये स्वप्निलनं सांघिक सुवर्णपदक मिळवलं होतं.
 
‘बुलेट खरेदीसाठी बँकेकडून कर्ज काढलं’
“नेमबाजीबाबत त्याने कधीही कंटाळा केल्याचं मला आठवतं नाही. तो याच्या सरावासाठी सतत तयार असतो. याशिवाय तो एकदम शांत आणि शिस्तबद्ध मुलगा आहे,” असं त्याचे वडील सुरेश कुसाळे बीबीसी मराठीशी बोलताना सांगतात.
 
सुरेश यांचं कुटुंब मुळचं राधानगरीतल्या कांबळवाडी गावचं. ते पेशानं शिक्षक आहेत तर स्वप्नीलची आई अनिता या कांबळवाडी गावच्या सरपंच आहेत.
 
मुलाची खेळातली आवड पाहून त्यांनी स्वप्नीलला नाशिकच्या क्रीडाप्रबोधिनीत दाखल केलं होतं. तिथे स्वप्नीलनं नेमबाजीची निवड केली. 2009 मध्ये वयाच्या 14 व्या वर्षापासून स्वप्नील नेमबाजीचा सराव करतो आहे.
 
पण नेमबाजीचा खेळ खार्चिक असतो. रायफल, जॅकेट यांवर खर्च करावा लागतो. एका एका बुलेटसाठीही बरेच पैसे लागतात.
 
एक काळ असा होता की सरावासाठी बुलेट्स खरेदी करण्यासाठी पुरेसे पैसे नसायचे. पण वडिलांनी कर्ज काढलं आणि मुलाला खेळासाठी प्रोत्साहन दिलं.
 
“सराव थांबू नये, यासाठी माझ्या वडिलांनी बँकेकडून कर्ज घेतलं आणि बुलेट्स खरेदीसाठी पैसे दिले. तेव्हा एक बुलेटची किंमत 120 रुपये असायची. त्यामुळे मी नेमबाजीचा सराव करताना प्रत्येक बुलेट काळजीपूर्वक वापरायचो. कारण अधिकचा खर्च परवडणारा नव्हता. मी जेव्हा या खेळासाठी सुरुवात केली तेव्हा माझ्याकडे पुरेसं सामानही नव्हतं,” असं स्वप्नीलने माध्यमांना सांगितलं होतं.
 
आपल्या यशात आईवडिलांसोबत त्याच्या प्रशिक्षक दीपाली देशपांडे यांचं मोठं योगदान आहे, असं स्वप्नीलने सांगितलं.
 
"दीपाली मॅडममुळे आयुष्यात आणि खेळात योग्य शिस्त लागली. त्यांनी आम्हाला या गोष्टी त्यांच्या कृतीतून सिद्ध करून दाखवलं. नेमबाजीशिवाय माणूस म्हणून कसं वागायला पाहिजे याची शिकवणही त्यांनी दिली," असंही स्वप्नीलने सांगितलं.
 
2013 उजाडेपर्यंत स्वप्नीलनं नेमबाजीत आपली चुणूक दाखवायला सुरुवात केली. तेव्हा 'लक्ष्य स्पोर्ट्स' सारखी संस्था त्याच्या पाठीशी उभी राहिली.
 
पुढे रेल्वेनंही स्वप्नीलला नोकरी दिली. 2015 पासून मध्य रेल्वेच्या पुणे विभागात प्रवासी तिकीट परीक्षक (TTE) म्हणून नोकरीला आहे.
 
तेव्हापासून त्याने बालेवाडीमधील छत्रपती शिवाजी महाराज क्रीडा प्रबोधिनीमध्ये सराव केला.
 
टॉन्सिलचा त्रास असतानाही चमकदार कामगिरी
आजवरच्या कारकीर्दीत स्वप्नीलला नेमबाज विश्वजीत शिंदे आणि दीपाली देशपांडे यांचं मार्गदर्शन लाभलं आहे.
 
स्वप्नीलविषयी त्याचे कोच विश्वजीत शिंदे सांगतात, “स्वप्नील हा अतिशय शांत मुलगा आहे आणि तो कधीच बडबड करत नाही. तो बाकी कोणत्याही फंदात न पडता सरावावर जास्त फोकस ठेवतो.”
 
नेमबाजीत राष्ट्रीय पातळीवर पोहोचल्यावरही स्वप्नीलचा आजवरचा प्रवास मात्र सोपा नव्हता.
 
गेली अनेक वर्ष त्याला तीव्र वेदना, ताप आणि अशक्तपणा असा त्रास जाणवायचा. अधूनमधून टॉन्सिलचं दुखणं सतत डोकं वर काढायचं.
 
हे का होतंय, याचं निदान लवकर निदान झालं नाही. त्यामुळे वेदना सहन करतच तो खेळत राहायचा.
 
शेवटी डिसेंबर 2023मध्ये या समस्येचं नेमकं कारण पुढे आलं. स्वप्नीलला दुधाची अ‍ॅलर्जी असल्याचं निष्पन्न झालं. दुधातल्या लॅक्टोजचा त्रास होत असल्यानं स्वप्नीलला दूध आणि दुग्धजन्य पदार्थ खाणं साफ बंद करावं लागलं.
 
पण तेव्हापासून त्याच्या तब्येतीत सुधारणाही झाली.
 
नेमबाजीच्या नेमक्या कोणत्या प्रकारात स्वप्नील खेळतोय?
नेमबाजी या खेळात रायफल, पिस्तूल आणि शॉटगन हे तीन मुख्य प्रकार आहेत. त्यात गुठली बंदूक वापरली जाते आहे, यानुसार वेगवेगळे प्रकार आहेत.
 
स्वप्नील 50 मीटर रायफल थ्री पोझिशनमधील प्रकारात ऑलिम्पिक पदकासाठी खेळणार आहे.
 
थ्री पोझिशन म्हणजे नीलिंग (गुडघ्यावर खाली बसून), प्रोन (झोपून) आणि स्टँडिंग (उभ्याने) नेमबाजी करणे.
 
नेमबाजीचा प्रकार हा इतरांपेक्षा आव्हानात्मक असतो, असं कोच विश्वजीत शिंदे सांगतात.
 
नेमबाजाला तीन वेगवेगळ्या शारिरीक पोझिशन्समध्ये फायरिंग करावी लागते आणि अचूक लक्ष्यवेध साधावा लागतो.
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती