बिंद्राने भारतीयांना दाखविला 'सोनियाचा दिनु'

वार्ता

सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (16:08 IST)
आजचा दिवसच काही वेगळा होता. इतिहासात नोंदवून ठेवावा असा. अभिनव बिंद्राने बीजिंग ऑलिंपिकमध्ये यशस्वी लक्ष्यभेद केला आणि तमाम भारतीयांचा आनंद गगनात मावेनासा झाला. अभिनवला सुवर्णपदक दिल्यानंतर भारतीय राष्ट्रगीताची धुन वाजविली जात असताना तिरंगा अधिक उन्नत झाल्याचेही वाटले. त्याचवेळी त्याच्या देशबांधवांना तर त्याचे किती कौतुक करावे किती नको असे झाले होते. आणि असे तरी का होऊ नये, कित्येक वर्षे या क्षणांसाठी त्यांनी वाट पाहिली होती. तो समोर दिसत होता.

ऑलिंपिक सुरू झाल्यापासून भारताला आजपर्यंत कधीही वैयक्तिक गटात सुवर्णपदक मिळाले नव्हते. कोट्यवधी भारतीयांना त्याची आस लागलेली होती. कित्येक पिढ्या गेल्या. हॉकीत तेवढे सुवर्णपदक आपण मिळवू शकलो. पण १९८० नंतर तर तेही दिसेनासे झाले. यावर्षी तर हॉकीचा संघही ऑलिंपिकला पात्र ठरू शकला नव्हता. ज्या नेमबाजांकडून आणि तिरंदाजांकडून अपेक्षा होत्या, त्यांनी सुरवातीलाच निराशा केल्याने पदकांची आशा फारशी उरलीच नव्हती. अशा परिस्थितीतच अचानक अभिनव बिंद्राने थेट सुवर्णपदकाला गवसणी घातल्याने भारतीयांची मान गर्वाने उन्नत झाली नसती तरच नवल. वर्षानुवर्षाची सुवर्णपदकाची भूक आज अखेर भागली गेली.

चीनच्या नभांगणात अभिनवच्या कर्तृत्वाने भारतीय तिरंगा डौलाने फडकला, ते पाहून प्रत्येक भारतीयाची मान आनंदाने उंच झाली. सोन्याचे ते पदक त्याने गळ्यात घातले आणि हात हवेत फिरवला. त्यावेळी जणू तो हे सांगत असावा की ' देखो, दुनियावालो, सबसे आगे होंगे हिंदूस्थानी.'

वेबदुनिया वर वाचा