बिंद्राचा 'अभिनव' पराक्रम, सुवर्ण भारताचे

वेबदुनिया

सोमवार, 11 ऑगस्ट 2008 (11:42 IST)
ND
ऑलिंपिकमध्ये वैयक्तिक सुवर्णपदक मिळविण्याचा भारताचा दुष्काळ अखेर आज नेमबाज अभिनव बिंद्राने संपविला. दहा मीटर एअर रायफल गटात त्याने सुवर्णपदक जिंकून इतिहास रचला. वैयक्तिक पातळीवर भारतातर्फे जिंकले गेलेले हे पहिले सुवर्णपदक आहे, यावरून त्याचे मोल लक्षात यावे.

यापूर्वी एकही भारतीय खेळाडू ही सुवर्णमयी कामगिरी करू शकलेला नाही. अथेन्स ऑलिंपिकमध्ये भारताच्या राजवर्धन राठोडने रौप्यपदकापर्यंत मजल मारली होती. त्यातही भारताला २८ वर्षांनंतर सुवर्णपदक मिळाले आहे. यापूर्वी १९८० मध्ये मास्को ऑलिंपिकमध्ये भारताला हॉकीत सुवर्णपदक मिळवले होते.

२६ वर्षीय बिंद्राला राजीव गांधी खेलरत्न पुरस्कारानेही सन्मानित करण्यात आले आहे. अभिनव बिंद्राने या कामगिरीने राजवर्धन राठोडच्या एक पाऊल पुढे जाऊन कामगिरी केली आहे.

अभिनवने या स्पर्धेत ७००.५ चा स्कोअर केला. त्याचवेळी यजमान चीनच्या जू किनाने ६९९.७ स्कोअर करून रौप्य तर फिनलंडचा हेन्री हक्कीनेन ६९९.४ स्कोअर करून कास्यपदक मिळवू शकला.

राष्ट्रपती प्रतिभा पाटील व पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांनी अभिनवचे त्याच्या यशाबद्दल अभिनंदन केले आहे.

वेबदुनिया वर वाचा