चीनमध्ये आठ हा आकडा किती शुभ आहे, याचा प्रत्यय ऑलिंपिक सोहळ्यावरून संपूर्ण जगाला आलाच. आता ऑलिंपिक चीनमधील नागरिकांसाठी किती महत्त्वाचे आहे याची साक्षही जगाला मिळाली.
चिनी नागरिक आलेल्या पाहुण्यांच्या स्वागतासाठी जिवाचे रान करत आहेत, तर हाच शुभ मुहूर्त मानत चीनमधील 16 हजार 500 जोडप्यांनी रेशीमगाठ बांधली. त्यांचे विवाहही ऑलिंपिक उद्घाटन सोहळ्या प्रमाणेच दिमाखात पार पडले.
पहाटेपासूनच चीनच्या विवाह नोंदणी कार्यालया बाहेर रांगाच रांगा लागल्या होत्या. आठच्या शुभमुहूर्तावर विवाह आणि त्यात आयुष्यभराची आठवण म्हणून त्याला ऑलिंपिकची जोड असा हा आपला विवाह अविस्मरणीय करण्यासाठी चीनमधील तरुण जोडपी आज इतकी उत्साहात होती की, एकट्या राजधानीत विवाहाची नोंदणी करण्यासाठी अखेर विवाह नोंदणी कार्यालयाला ऑन लाइन सेवा सुरू करण्याचा निर्णय घ्यावा लागला.
आठ या आकड्याला चीनमध्ये अन्योन्य साधारण महत्त्व आहे. आठ या आकड्याचा उच्चार 'फा' असा केला जात असल्याने ते शुभ संकेत मानले जाते.
गेल्यावर्षी याच कालावधीत जवळपास चार हजार विवाह झाले होते.