आयफोन 15 लाँच, 'हे' आहेत नवीन फीचर्स

बुधवार, 13 सप्टेंबर 2023 (15:15 IST)
अ‍ॅपलने आपल्या नव्या आयफोनमध्ये लाइटनिंग चार्जिंग पोर्ट ऐवजी सी-टाइप चार्जिंग पोर्ट असल्याची माहिती स्पष्ट केली आहे. युरोपियन युनियनच्या दबावामुळे हा बदल कंपनीने केला आहे.
 
आतापर्यंत फक्त इतर फोनपेक्षा हे वेगळेपण जपणाऱ्या आयफोनची लाइटनिंग चार्जिंग पोर्ट ही एक ओळख होती. मात्र आता कंपनीनं य़ात बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
 
मंगळवारी (12 सप्टेंबर 2023 रोजी) अ‍ॅपलने आपल्या वार्षिक लाँच कार्यक्रमात, आता आयफोनमध्येही जागतिक स्तरावर स्वीकारलेला मापदंड म्हणून यूएसबी सी केबलच वापरली जाणार असल्याचं सांगितलं.
 
या कार्यक्रमात अ‍ॅपलने आपल्या वॉचची नवी मालिकाही लाँच केली. यामध्ये पूर्वीपेक्षा जास्त क्षमतेची चिप असेल.
 
अर्थात तज्ज्ञांच्या मते अ‍ॅपलने यावर्षी आणलेला अपडेट फारसा उल्लेखनीय म्हणावा असा नाही त्यामुळे लोक निराश होतील.
 
सीसीएस इनसाइटशी संबंधित बेन वूड सांगतात, "आयफोन आणि अ‍ॅपल वॉचही आता परिपक्व उत्पादनं झालेली आहेत आता अशावेळेस त्यात हा बदल हैराण करणारा आहे."
 
ते म्हणतात, "यामुळे आयफोन आणि वॉच ही किती उत्कृष्ठ उत्पादनं आहेत आणि दरवर्षी सनसनाटी निर्माण करणारी अपडेट्स आणणं किती अवघड आहे हे दिसतं."
 
नवा आयफोन पुढच्या आठवड्यात बाजारात येईल. वैकल्पिक चार्चिंग पोर्ट असणारा हा 2012 नंतरचा पहिलाच आयफोन असेल.
 
यूएसबी सी टाइप केबल अनेक लॅपटॉप आणि आयपॅडला वापरली जाते एअरपोडस प्रो व्हर्जन आणि वायरवाल्या इयरपोड हेडफोनवरही काम करेल.
 
युरोपियन युनियनने अ‍ॅपलला ग्राहकांच्या सोयीसाठी लाइटनिंग चार्जिंग पोर्ट बंद केला पाहिजे. यामुळे लोकांचा पैसाही वाचेल आणि चार्जर अनेकदा वापरला गेल्यामुळे ई कचराही कमी होईल असं त्यांचं मत होतं.
 
अर्थात काही लोकांनी यामुळे पुढील काळात केबलचा कचरा वाढण्याची शक्यता आहे.
 
आपल्या लाँच कार्यक्रमात अ‍ॅपलने पर्यावरणासंदर्भातीलही काही घोषणा केल्या. आपल्या वॉच रेंजमधील उत्पादनं पहिल्यांदाच कार्बन न्यूट्रल होतील असं अ‍ॅपलने सांगितलं आहे.
 
नव्या आयफोन आणि वॉचमध्ये रिसायकल केलेली उपकरणं जास्त प्रमाणात वापरली जातील तसेच त्यात बॅटरीचाही समावेश आहे.
 
आपल्या कोणत्याही उत्पादनात व इतर सामानात चामड्याचा वापर करणार नाही तसेच 2030 पर्यंत कार्बन न्यूट्रल होण्याचं आश्वासनही या कंपनीने दिलं आहे.
अ‍ॅपलचे प्रमुख टीम कुक यांनी, "नवा आयफोन 15 हा आतापर्यंत कंपनेनी बनवलेला सर्वात चांगला आणि शक्तीशाली" असेल असं म्हटलं आहे.
 
आयफोन 15 आणि 15 प्लसमध्ये अधिक चांगली स्क्रीन आणि कॅमेरा प्रणाली असेल. यापेक्षा महाग असणाऱ्या आयफोन 15 प्रो मॅक्समध्ये टायटॅनियम असेल त्यामुळे फोन जास्त मजबूत होईल.
 
प्रो आणि प्रो मॅक्समध्ये म्यूट स्विचच्या जागी अॅक्शन बटण असेल, त्याला वेगवेगळ्या कामांसाठी आपापल्या गरजेनुसार सेट करता येईल.
 
नव्या अ‍ॅपल वॉचमध्ये जेस्चर कंट्रोलही असेल त्यामुळे हातात घातलेल्या घड्याळावर दोनवेळा टॅप केल्यावर ती घड्याळ घालणारी व्यक्ती फोन सुरू करू शकेल किंवा बंद करू शकेल.
 
काही तज्ज्ञांच्या मते जुनी उत्पादनं आणि नवे उत्पादन यात फरक नसला तरी यासाठी ग्राहक जास्त पैसे द्यायला तयार होतील.
 
ब्रिटनमध्ये आयफोन 15 ची किंमत 999 पौंड म्हणजे 1 लाख रुपये एवढी असेल.
पीपी फॉरसाइटचे संस्थापक आणि विश्लेषक पाऊलो पेस्काटोर सांगतात, "सध्या सर्व गोष्टी महाग होत असताना ग्राहकांना अधिक खर्च करायला लावणं सोपं नाही."
 
पाऊलो सांगतात, "नवी फिचर्स काही लोकांना आवडतील, मात्र एकूणात पाहाता ते फक्त युजर एक्सपिअरिअन्सला अधिक चांगलं करतात. अ‍ॅपलचा जो मूळ ग्राहक आहे त्याला ते भरपूर आवडतं."
 
मंगळवारी अ‍ॅपलच्या शेअर्समध्ये किरकोळ घसरण नोंदली गेली. गेल्या आठवड्यात चीन सरकारच्या अधिकाऱ्यांसाठी अ‍ॅपल फोनच्या वापरावर बंदी घालण्याची बातमी आल्यावर कंपनीच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली होती. ही घसरण लाँच कार्यक्रमाने भरुन निघाली नाही.
 
ख्वावेने चीनमध्ये एक नवा स्मार्टफोन आणला आहे त्यामुळेही कंपनीच्या गुंतवणुकदारांत अस्वस्थता आहेय
 
आर्थिक वर्ष 2023 च्या दुसऱ्या तिमाहीत जगभऱात फोन ग्राहकांमध्ये घट दिसली, गेल्या तिमाहीच्या 29.45 कोटी फोन्सच्या तुलनेत दुसऱ्या तिमाहीत 26.8 च फोन विकले गेले.
 
अर्थात अ‍ॅपलची विक्री इतर स्मार्टफोन कंपनींच्या तुलनेत कमी झाली आहे. काऊंटर पॉइंट रिसर्चच्या माहितीनुसार अ‍ॅपलची विक्री 4.65 कोटी वरुन 4.53कोटी वर आली आहे.
 





Published By- Priya Dixit 
 
 
 
 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती