सेल्फीमुळे सेल्फमर्डर

सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (12:06 IST)
स्वत:च्या स्मार्टफोनने स्वत:चे चित्रविचित्र फोटो, अर्थात सेल्फी काढून सोशल साइटवर पोस्ट करण्याचे फॅड नवे नाही. पण, मित्र-मैत्रिणींना इम्प्रेस करण्यासाठी लोडेड गन डोक्यावर ठेवून सेल्फी काढण्याचा प्रयत्न अमेरिकेतील एका 21 वर्षीय तरुणाच्या जीवावर बेतला आहे. एका हातात फोन आणि दुसर्‍या हातात बंदूक घेऊन फोटो काढण्याच्या गोंधळात फॅटो क्लिक करण्याऐवजी तरुणाने चुकून गनचा ट्रिगर दाबल्याने त्याचा मृत्यू झाला. प्राण्यांचा डॉक्टर असलेल्या ऑस्कर ओट्रो अँग्यूलर याला फेसबुकवर एखादे हटके प्रोफाइल पिक्चर टाकण्याची लहर आली. त्यातून स्वत:ला गन पॉइंटवर ठेवून सेल्फी काढण्याचा विचार त्याच्या मनात आला. तो प्रत्यक्षात आणण्यासाठी ऑस्कर एका हातात गन व दुसर्‍या हातात मोबाइल घेऊन आरशासमोर उभा राहिला. मात्र, फोटो क्लीक करताना त्याचा ताळमेळ चुकला. मोबाइलवर क्लिक करण्याऐवजी चुकून त्याने गनचे ट्रिगर दाबले. खूप जवळून डोक्यात गोळी घुसल्याने ऑस्कर रक्तबंबाळ होऊन तो जागीच कोसळला.
 
गोळी झाडल्याचा आवाज आणि त्याचबरोबर ऑस्करच्या तोंडातून निघालेली काळीज चिरणारी किंकाळी ऐकून शेजारी धावत आले. ते घरात आले तेव्हा रक्ताच्या थारोळ्यात तडफडत पडलेला ऑस्कर त्यांना दिसला. तो जिवंत असल्याचे बघून शेजार्‍यांनी त्याला रुग्णालयात नेण्याची तयारी केली. मात्र, रुग्णालयात पोहोचण्याआधीच त्याचा मृत्यू झाला. पोलिसांनी या प्रकरणाची चौकशी सुरू केली आहे.

वेबदुनिया वर वाचा