एखादी नवी कार घेतल्यानंतर साधारणत: वर्षभरात तिच्या किमतीत 20 टक्क्यांची घट होते. मात्र, नवा स्मार्टफोन घेतल्यानंतर साधारणत: महिनाभरातच त्याच्या किमतीत 65 टक्क्यांची घट होत असल्याचा निष्कर्ष ‘म्युझिकमॅगपाय डॉट को डॉट यूके’या वेबसाइटने अभ्यासाअंती काढला आहे. या निष्कर्षाला ‘अँपल’चा ‘आयफोन’ मात्र अपवाद ठरला आहे. सध्या बाजारात उपलब्ध असलेल्या अँड्रॉइड स्मार्टफोच्या तुलनेत ‘आयफोन’विकत घेतल्यानंतर स्वत:चा भाव कायम ठेवण्यात यशस्वी ठरल्याचेही अभ्यासात नमूद करण्यात आले आहे.
बाजारात सादर होऊन पाच वर्षाचा कालावधी उलटूनही ‘आयफोन फोर एस’च्या किमतीत 61 टक्क्यांनी घट झाली आहे, तर वर्षभरानंतर ‘आयफोन सिक्स’ची (16जीबी) किंमत पन्नास टक्क्यांनी घटली आहे. त्या तुलनेत ‘आयफोन फाइव्ह’च्या किमतीत सादरीकरणानंतर आठ महिन्यांनी 66 टक्क्यांची घट नोंदविण्यात आल्याचेही अभ्यासात स्पष्ट करण्यात आले आहे. बाजारात सादर होऊन केवळ दोनच महिने झालेल्या ‘सॅमसंग’च्या ‘गॅलेक्सी एस फोर’च्या किमतीतही जवळपास निम्मी घट झाली आहे. दाखल होतेवेळी या स्मार्टफोनची किंमत 579 पौंड होती. मात्र, आता हा फोन 279 पौंडातच उपलब्ध आहे.