जेक्स्ट्राद्वारे इंटरनॅशनल कॉल मोफत

सोमवार, 11 ऑगस्ट 2014 (12:12 IST)
परदेशात गेल्यावर नातेवाईकांशी संवाद साधताना होणारा फोन कॉलचा खर्च आता ‘चकटफू’ होणार आहे. यासाठी जेक्स्ट्रा टेक्नॉलॉजीने ‘वाय फाय झोन’मध्ये सीमकार्डवरून फोन लावता येईल असे तंत्रज्ञान विकसित केले आहे. यामुळे नागरिकांना वायफाय झोनमध्ये फिरताना नातेवाईकांशी तासन् तास मोफत संवाद साधता येणार आहे. ‘सध्याच्या वेगाने बदलत असलेल्या मोबाइल युगात ग्राहकांनी अधिक फायदेशीर योजना द्यावी, या उद्देशाने आम्ही गेल्या दोन वर्षापासून काम करीत होतो. याच संशोधनातून वायफाय झोनमध्ये फोन कॉल करण्यासाठी वापरता येईल, असे सीमकार्ड आम्ही विकसित केले आहे,’ अशी माहिती अमल पुरंदरे यांनी दिली. ‘विविध कारणांमुळे परदेशात जाणार्‍यांची संख्या वेगाने वाढते आहे. मात्र तेथून मायदेशी फोन करणे सगळ्यांना परवडत नाही. पण, परदेशात बहुतांश ठिकाणी वायफाय झोन आहेत. जेव्हा ग्राहक वायफाय झोनमध्ये जाईल, तेव्हा आम्ही विकसित केलेले अँप्लिकेशन वायफाय झोनच्या माध्यमातून काम करणार असल्याने नागरिकांना अत्यल्प दरात फोन करणे शक्य होणार आहे,’ असे पुरंदरे यांनी सांगितले. 
 
वारंवार परदेश दौरे करणार्‍यांना सतत बदलणार्‍या नंबरमुळे त्रास होतो. या धर्तीवर एक ग्राहक एकच नंबर अशी योजना आम्ही सादर केली आहे. परदेश दौर्‍यासाठी यापुढे ‘टेक्स्ट्रा’चे कार्ड घेतल्यावर ग्राहकाला जो फोन नंबर दिला जाईल, तो भविष्यातही त्याच्याच नावावर राहणार आहे, एवढेच नव्हे तर ती व्यक्ती मायदेशी परतल्यावर संबंधित फोन नंबर येणारे फोन आणि मेसेजची माहिती मायदेशातील नंबरवर पाठविण्यात येणार आहे, अशी माहिती पुरंदरे यांनी दिली.

वेबदुनिया वर वाचा