ग्राहकांची माहिती साठवण्यासाठी शाओमीचं डेटा सेंटर

बुधवार, 29 ऑक्टोबर 2014 (11:58 IST)
चायनीज स्मार्टफोन निर्माती कंपनी शाओमी लवकरच भारतात कस्टमर डेटा सेंटर सुरू करणार आहे. शाओमीने आज जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात ही माहिती देण्यात आली. शाओमीने फ्लिपकार्टच्या माध्यमातून भारतात अलीकडेच लक्षावधी स्मार्टफोनची विक्री केली आहे. पुढील वर्षापर्यंत हे डेटा सेंटर भारतात सुरू होण्याची शक्यता आहे. शाओमी स्मार्टफोन खरेदी करणार्‍या भारतीय ग्राहकांची माहिती चीनमधील सर्वरमध्ये साठवली जात असल्याचा आणि त्याचा दुरूपयोग होत असल्याचा आरोप काही महिन्यांपूर्वी करण्यात आला होता. त्यावेळी भारतीय ग्राहकांची माहिती चीनमधील सर्वरमध्ये साठवली जात असल्याचे मान्य करून शाओमीने त्याचा व्यावसायिक वापर होत नसल्याचा खुलासा केला होता. आता भारतीय कायद्याचा आदर करण्यासाठी शाओमीने भारतातच कस्टमर डेटा सेंटर सुरू करण्याचा निर्णय घेतलाय. 
 
गेल्या काही महिन्यात सर्व हाय एन्ड स्मार्टफोनचे फीचर्स असलेले स्मार्टफोन अतिशय कमी किंमतीत भारतीय बाजारात उतरवून आणि ऑनलाईन शॉपिंगच्या माध्यमातून त्याची विक्री करून मोठा धमाका केला होता. त्यामुळे अनेक स्मार्टफोन उत्पादक कंपन्यांना आपल्या हँडसेटच्या किंमतीचा फेरविचार करावा लागला होता. गेल्या काही महिन्यात शाओमीच्या फोनला भारतीय ग्राहकांचा उदंड प्रतिसाद 
मिळाल्यानंतर ऑक्टोबर महिन्यात तब्बल एक लाख फोनच्या विक्रीचं उद्दिष्ट शाओमीने ठेवलंय. शाओमी भारतीय यूजर्सचा डेटा चीनमधील सर्वरमध्ये साठवत असल्यामुळे सरकारी कर्मचार्‍यांनी शाओमी फोन वापरू नये अशा सूचना जारी केल्या होत्या. त्यामध्ये इंडियन एअर फोर्सचाही समावेश होता.

वेबदुनिया वर वाचा