आता मेसेज ‘अनसेंड’ करणं शक्य!

बुधवार, 1 एप्रिल 2015 (14:13 IST)
बर्‍याच वेळा सोशल मीडियावर टाकलेला मेसेज अथवा पाठविलेला एसएमएस मुळात पाठविलाच नसता तर बरं झालं असतं, किंवा एखाद्या ठराविक व्यक्तीला तरी निदान तो मेसेज पाठवायला नको होता, अशी पश्चातबुद्धी आपल्याला होते. पण या मेसेजेसच धनुष्यातून सुटलेल्या बाणासारखं असतं आणि एकदा पाठविला की तो पुन्हा मागे घेता येत नाही, म्हणून आपण हळहळत बसतो. पण आता न्यूयॉर्कमधील एका कंपनीनं पाठविलेला मेसेज ‘अनसेंड’ करण्याचं आणि तो ज्याला मिळाला असेल त्याच्या स्मार्टफोनवरूनही तो कायमचा पुसून टाकण्याचं एक नवं ‘अँप’ विकसित केलं आहे.

‘RakEM’असं या अँपचं नाव असून त्यामुळं नको असलेला मेसेज ज्या संवादसाधनावरून (डिव्हाईस) पाठविला त्यावरून आणि ज्यावर मिळाला असेल अशा दोन्ही ठिकाणांहून पुसून टाकता येतो. या अँपमुळे इन्स्टंट मेसेजिंग, फाइल, इमेज अँण्ड लोकेशन शेअरिंग, व्हॉईस अँण्ड व्हिडिओ कॉलिंग या सर्वांना चिरेबंदी ‘प्रायव्हसी’चं कवच मिळू शकतं, असाही या कंपनीचा दावा आहे.

लोकांच्या आग्रहामुळं न्यूयॉर्कमधील राकेतू ‘RakEM’कंपनीनं हे अँप विकसित केलं आहे. कंपनीचे अध्यक्ष आणि मुख्य कार्यकारी अधिकारी ग्रेग पार्कर म्हणाले की, संदेशवहनातील गोपनीयतेवर अतिक्रमणं झाल्याच्या बातम्या दररोज प्रसिद्ध होत असताना आपण पाठवीत असलेले संदेश पूर्णपणे खासगी आणि सुरक्षित राहतील याविषयी लोक आता अधिक आग्रही होऊ लागले आहेत. यातूनच हे अँप तयार केलं गेलं आहे.

वेबदुनिया वर वाचा