निसर्ग म्हणजेच साक्षात देवी

बुधवार, 14 ऑक्टोबर 2015 (15:05 IST)
दधाना कर पद्माभमक्षमाला कमण्डलू।
देवी प्रसीदतु मयि ब्रह्म चारिण्नुत्तमा।।
 
देवीला मूळ प्रकृती सर्वच ठिकाणी म्हटले आहे. निसर्ग म्हणजेच साक्षात देवी. किंवा असे म्हणता येईल की, स्त्रीरूप म्हणजेच चालता-बोलता निसर्ग. या जगावर ज्याचे वर्चस्व कायम राहिले आणि अजूनही राहणारच आहे, तो म्हणजे निसर्ग. अनादि काळापासून ज्याचे कार्य सुरळीतच चालले आहे, तो निसर्ग च्याच्यावर या आदिमायाचे अधिराज्य आहे. निसर्गाचे उत्तम प्रकारे चाललेले चक्र तिच्याच कृपेने व्यवस्थित चालू आहे. 
 
तीच ब्रह्मा आहे, तीच विष्णू आणि शिवही तीच आहे. या त्रिदेवांची स्थिती तीच आहे. ती ब्रह्मा म्हणजे जगनिर्माती असून विष्णू रूपाने जगाचे पालन करते म्हणून तिला जगन्माता म्हटले जाते. तीच काली शिवरूपाने या विश्वावर नियंत्रण ठेवते. ती प्रचंडा आहे. जसे श्रीकृष्ण परमात्मने विश्वरूप उलगडून दाखवले, अगदी तसेच दर्शन तिने चंडमुंड या दैत्यांचा संहार समयी जगास दाखविले. या रूपात ती कोणास उग्र तर कोणास आईचे ममता रूप वाटते. रामकृष्ण परमहंस याच रूपाचे नेहमी स्मरण करत आणि आईनेही त्यांना याच रूपात दर्शन दिले. 
 
पृथ्वी ही तिचीच एक मनस्मृती आहे. पूर्वादी दिशांवर तिचीच सत्ता आहे. तीच वारा, तीच ऊन, पाऊस आहे. अग्नीही तीच आहे, जीवनही तीच आहे. इंद्रादी अष्टदिक् पालांचे संयोजन तिचेच असून, या जगाचे नियंत्रण तिच्याच इच्छेने हे अष्टदिकपाल करतात. 
 
आठ वसू, अकरा रूद्र, बारा आदित्य यांच्या कडूनही जगाचे नियंत्रण करत असते. ती जगाची चेतना, तीच स्फूर्ती आणि तीच चैतन्य आहे. घडणार्‍या चांगल वाईट घटनांची तीच रचयती आहे. तीच मृत्यू म्हणजे चामुण्डा आहे. 
 
आपला विजय तीच आहे आणि पराजयही. आपल्या पराजयातही जय असतो. आपल्या विवेक बुद्धीला जाणवून देणारी सद्सद् विवेक बुद्धी तीच आहे. या विश्वाला समप्रमाण दर्शविणारा अविवेकही तीच आहे. कवींची प्रतिभा तीच आहे. लेखकांची विचारशक्तीही तीच. तीच गुरुंत्या ठायी असलेली ‘माधवी’ आहे. योगाची कुंडलिनी, जेतिषांची वाचा सिद्धीही तीच आहे. वाचेतली ‘मंगला’ तीच आहे. बाहूमधले धैर्य वज्राप्रमाणे धारण करणारी हीच आहे. अनेक शोकांचा विनाश करून भक्तांना मायेने पांघरूण घालणारी महादेवी तीच आहे. तीच हृदयातला प्राण आहे आणि या नश्वर देहाला सतेज ठेवणारी ‘कल्याणी’ तीच आहे. या जगावर तिचीच सत्ता आहे. तिच्याशिवाय हे अखंड संवत्सरचक्र, एवढय़ा व्यवस्थितपणे चालवूच शकत नाही. म्हणूनच तिला निसर्ग म्हटलं. आणि स्त्री हे निसर्गाचे, च्या जगन्मातेचे प्रतीक आहे. तिचा आदर केलाच पाहिजे. (देवी महिमा : 2)
 
विठ्ठल जोशी 

वेबदुनिया वर वाचा