बच्‍चन आणि बोल बच्‍चन

विकास शिरपूरकर

शुक्रवार, 26 मार्च 2010 (18:42 IST)
PTI
महाराष्‍ट्राच्‍या मुख्‍यमंत्रिपदाच्‍या खुर्चीचे बॉलीवुडशी काहीतरी वावडे असावे अशी शंका राहून-राहून सध्‍या आमच्‍या मनात येते आहे. किमान पक्षी कॉंग्रेजी सरकारच्‍या कुंडलीत तरी बॉलीवुडचे तारे हे राहू म्हणून ठाण मांडूनच बसले असावेत अशी आता आमची पक्की धारणा होऊ लागली आहे.

हे सर्व सांगण्‍याचं कारणही तसंच आहे. मुंबईवर हल्‍ला झाला आणि या हल्‍ल्‍याचे भयावह वास्‍तव दाखवण्‍यासाठी तत्कालीन मुख्‍यमंत्री विलासरावांनी
आपले चित्रपट व्‍यवसायातले 'मित्र' रामू पक्षी रामगोपाल वर्मा यांना हॉटेल ताजची सफर घडवून आणली आणि कपाळमोक्ष करून घेतला. अर्थात ही सफर घडवण्‍यामागे पोराच्‍या करीअरची काळजी होतीच हे सांगण्‍यासाठी कुणा होरारत्नाची गरज नसावी. त्‍यांच्‍या या कृतीनंतर काहीच दिवसात त्यांच्‍या बुडाखालची खुर्ची सरकली आणि तिथे अशोकराव येऊन बसले.

आता या घटनेला जवळपास दीड वर्ष उलटल्‍यानंतर इतिहासाची पुनरावृत्ती झाली आहे. वांद्रे ते वरळी सागरी सेतूच्‍या उर्वरित चार रस्‍त्‍यांच्‍या उदघाटन कार्यक्रमासाठी बिग बी अमिताभ बच्‍चन यांना आमंत्रित करण्‍यात आले होते. आता अमिताभ येणार म्हणून आमचे अशोकराव काय तयारीने गेले म्हणून सांगू त्‍यासाठी खास ऑफ व्‍हाईट कलरचा सुट त्‍यांनी बनवून घेतला. शिवाय हिंदी पिक्चरच्‍या हिरोला शोभावा असा काळा गॉगल... आणिही बरचं काही. तर या स्‍पर्धेत उपमुख्‍यमंत्री छगनराव ही काही मागे नव्‍हते. त्यांनीही अगदी तसाच अवतार धारण करून अमिताभचे स्‍वागत केले. कार्यक्रम झाला. सगळ काही छान पार पडलं.

मात्र हा नवा सूट अंगावरून उतरण्‍यापूर्वीच आपल्‍या मानगुटीवर नवा वाद येऊन बसेल याची तसुभरही कल्‍पना अशोकरावांना नसावी. अमिताभची गुजराचे मुख्‍यमंत्री नरेंद्र मोदी यांच्‍याशी वाढलेली जवळीक आणि ते गुजराचे ब्रांड अम्‍बॅसेडर असल्‍याची बतावणी करत मुख्‍यमंत्र्यांविरोधात त्‍यांच्‍याच पक्षाच्‍या नेत्यांनी उघड टीका ककरण्‍यास सुरूवात केली. अर्थात या नेत्यांनी सांगितलेल्‍या कारणांपेक्षा बच्‍चन कुटुंबीयांचा गांधी घराण्‍याशी असलेला दुरावा हे या विरोधामागचे प्रमुख कारण आहे हे सुज्ञ वाचकांना नव्‍याने सांगण्‍याची गरज नसावी.

दुधामुळे तोंड पोळलेल्‍या विलासरावांपासून बोध घेत मुख्‍यमंत्र्यांनी मानगुटीवरचा हा वाद लगेच झटकत मला या कार्यक्रमाला बच्चन येणार हे माहीत नव्‍हतं असा धोशा आता सुरू केला आहे.

अर्थात कार्यक्रम सरकारी त्यामुळे बच्‍चन यांना बोलावणे आणि त्‍यांचे नाव उदघाटनाच्‍या पत्रिकेत असणे हे देखिल मुख्‍यमंत्र्यांना माहीत नव्‍हते हे पटण्‍यासारखे नाही. तसे असते तर मुंबईतल्‍या सर्व वृत्तपत्रांमध्‍ये भरभरून मोठ-मोठ्या जाहिराती कुणी दिल्‍या? हा प्रश्‍न आहेच.

मूळात अमिताभ बच्‍चन अनेक वर्षांपासून मुंबईत वास्‍तव्‍यास आहेत. महानायक असण्‍यासोबतच समाजामध्‍ये प्रतिष्‍ठा असलेले आणि मुंबईबद्दल प्रेम असलेली ती व्‍यक्ती आहे. त्यांना सी-लिंकच्‍या कार्यक्रमात बोलावणे चुकीचे कसे असू शकेल. त्‍यांना या कार्यक्रमात येण्‍याचा पूण्र अधिकार आहेच. मुंबईत बनविण्‍यात आलेला हा सागरी सेतू काही कॉंग्रेस पक्षाची खाजगी मालमत्ता नाही किंवा या कार्यक्रमाला कुणाला बोलवायचे आणि कुणाला नको हे ठरविण्‍याचा अधिकारही मुंबई कॉंग्रेसला नाही. मात्र तरीही त्‍यांनी तसं केलं.

असो झालं ते झालं पण वाद अधिक वाढू नये म्हणून आता हायकमांडने मुख्‍यमंत्र्यांसाठी आचारसंहिताच घालून दिली आहे. ज्‍या कार्यक्रमात बच्‍चन जाणार असतील त्‍यात मुख्‍यमंत्र्यांनी जाऊ नये असे फर्मानच '10 जनपथ'वरून जारी करण्‍यात आलं आहे.

या सर्व प्रकारात आता पुण्‍याच्‍या मराठी साहित्य संमेलनाच्‍या संयोजकांची मात्र गोची झाली आहे. कारण समारोपाच्‍या कार्यक्रमाला बच्‍चन आणि चव्‍हाण दोघेही येणार होते. आता आलं तर कुणीतरी एक जण येईल किंवा दोघंही येणार नाहीत. अशा स्थितीत काय करावं अशा कात्रित संयोजक अडकले आहेत.

मूळात साहित्य किंवा संस्‍कृतीशी संबंधित अशा कार्यक्रमात अशा प्रकारचं राजकारण यावं हाच मोठा चिंतेचा विषय झाला आहे.

तर दुस-या बाजूला नेहमी प्रमाणे सरकारच्‍या कुठल्‍याही धोरणाला विरोध करायचा हे धोरण विरोधकांनी या घटनेतही बिनबोभाट पाळत बच्‍चन यांना पाठिंबा दर्शवत सरकारवर तोंडसुख घेतले आहे.
प्रत्येक पक्ष आप-आपल्‍या पद्धतीने या मुद्यावरून आपली राजकीय पोळी भाजून घेण्‍याचा प्रयत्न करीत आहे.


राजकारणाच्‍या या स्थितीवर एक भारतीय म्हणून शरमेने मान खाली घालण्‍याशिवाय आणखी आपण काय करू शकतो. कारण आपल्‍या नेत्यांना तर कसली लाज वाटण्‍याची अपेक्षा करणेच मुर्खपणाचे आहे.

वेबदुनिया वर वाचा