उत्तर प्रदेशात हुल्लडबाजांकडून महिलेशी गैरवर्तन, 16 जणांना अटक, पोलीस अधिकाऱ्यांच्या बदल्या
शुक्रवार, 2 ऑगस्ट 2024 (17:17 IST)
लखनऊच्या गोमतीनगर भागात बुधवार 31 जुलै रोजी मुसळधार पाऊस झाला. त्यावेळी पाऊस सुरू असताना एका महिलेची काही जणांनी छेड काढली. ही महिला एका व्यक्तीबरोबर दुचाकीवरुन जात होती. याप्रकरणी आतापर्यंत 16 जणांना अटक करण्यात आली आहे.
घटनेचा व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाल्यानंतर, उत्तर प्रदेश सरकार व पोलिसांवर कायदा आणि सुव्यवस्थेवरुन अनेक प्रश्न उपस्थित केले जात आहेत. मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी अटकेतील आरोपींपैकी फक्त दोघांचीच नावे घेतल्याने, विरोधकांनी प्रश्न उपस्थित केले असून, मुख्यमंत्री या घटनेवरुन राजकारण करत असल्याचा आरोप विरोधी पक्षानं केलाय.
दबाव वाढत असल्याने उत्तर प्रदेश सरकारकडून डीसीपी, एडीसीपी आणि एसपी यांच्या बदल्या करत एसएचओसह ठाणे प्रभारी व काही शिपायांवर निलंबनाची कारवाई करण्यात आलीय. आरोपींवर कठोर कारवाई करण्यात येईल, असं योगी सरकारने सांगितलंय.
पोलिसांनी पवन यादव आणि सुनील कुमार नावाच्या व्यक्तींना सीसीटीव्हीच्या आधारे तर अरबाज आणि विराज साहू या दोघांना प्राप्त माहितीच्या आधारे अटक केली आहे. घटनेतील इतर आरोपींचा शोध सुरू असल्याचं पोलिसांकडून सांगण्यात आलयं.मात्र, घटनेतील पीडितेकडून अद्याप कोणतीही प्रतिक्रिया आलेली नाही.
नेमकं काय घडलं?
बुधवारी लखनऊमध्ये झालेल्या जोरदार पावसामुळे ठिकठिकाणी मोठ्या प्रमाणात पाणी साचलं होतं.
ताज होटेलनजीकच्या पुलाजवळ डझनभर लोकांचा घोळका पाण्यात दंगा-मस्ती करत होता. दरम्यान, एक तरुण एका महिलेसह दुचाकीने तेथून जात असताना या घोळक्याने त्यांच्यावर पाणी उडवत त्यांना दुचाकीवरून खाली पाडलं, असल्याचं सीसीटीव्हीमधील व्हीडीओत कैद झालयं.घटनेचा व्हीडिओ व्हायरल होताच पोलिसांनी कारवाई करत त्याच रात्री अनेकांची ओळख पटवत त्यांना अटक केली.
काँग्रेस नेत्या आराधना मिश्रा मोना यांनी या प्रकरणावरून विधानसभेत प्रश्न उपस्थित केला. त्यावर योगी सरकार ने आरोपींना कोणतीही सवलत दिली जात नसल्याचं सांगितलं.मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ विधानसभेत बोलताना म्हणाले, “राज्यातील गोमती नगरच्या घटनेची जबाबदारी आम्ही निश्चित केली आहे. यातील आरोपी पवन यादव व दुसरा मोहम्मद अरबाज हे सद्भावनेचे लोक आहेत. त्यांच्यासाठी बुलेट ट्रेन धावणार नाही.
आम्ही ही घटना गांभीर्याने घेतली असून या प्रकरणी ठाण्यातील कर्मचाऱ्यांनाही निलंबन करण्यात आलयं. त्यांच्याविरोधातही कारवाई करण्यात येईल.”
विरोधी समाजवादी पक्षानेही या घटनेवरून प्रश्न उपस्थित केलाय.
पक्षाचे प्रवक्ते फखरुल हसन यांनी बीबीसीशी बोलताना सांगितलं, “कोणत्याही गुन्ह्याकडे धर्म किंवा जातीच्या चौकटीतून नव्हे तर गुन्हेगारीच्या दृष्टीकोनातून बघितलं पाहिजे. मुख्यमंत्र्यांनी दोन आरोपींची नावे घेतली मात्र इतर आरोपींची नावे अद्याप समोर आलेली नाहीत. आरोपी हा कोणत्याही वर्गाचा असो त्याच्यावर कठोर कारवाई व्हायला हवी, अशी समाजवादी पक्षाची भूमिका आहे.”
सपा खासदार डिंपल यादव यांनी घटनेप्रकरणी एएनआय या वृत्तसंस्थेशी बोलताना प्रतिक्रिया दिली.
त्या म्हणाल्या, “घटनेचा व्हीडिओ आपल्यासमोर आहे, त्यामुळे कोण काय करत होतं हे सहज ओखळता येऊ शकतं. सरकारने त्या अनुषंगाने कारवाई करावी.”
घटनेतील पीडित महिला कुठे आहे?
गोमतीनगर पोलिसांनी घटनेतील पीडितेचा शोध घेण्याचा प्रयत्न केला मात्र, गुरुवारी दुपारपर्यंत तिचा शोध लागला नव्हता. सीसीटीव्हीमध्ये दुचाकीची नंबरप्लेट दिसत नसल्याने शोध घेण्यास अडचण येत असल्याचं पोलिसांनी सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी उपनिरीक्षकाच्या तक्रारीवरून गुन्हा दाखल केला आहे.
बीबीसीची टीम गोमतीनगर पोलीस ठाण्यात पोहोचली तेव्हा त्यांना आरोपीचे कुटुंबीय मिळाले. आपल्या पोरांना यात अडकवण्यात आलं असल्याचा दावा कुटुंबीयांनी केलाय. तर, ही कारवाई सीसीटीव्हीत कैद झालेल्या लोकांच्या ओळखीनुसारच करण्यात आली असल्याचा दावा पोलिसांनी केलाय.
लखनऊ पोलिसांच्या प्रवक्त्या डीसीपी रवीना त्यागी माध्यमांशी बोलताना म्हणाल्या, “सीसीटीव्हीनुसार कारवाई केली जात असून आणखी लोकांची ओळख पटवली जात आहे. पोलिसांची तीन पथकं कार्यरत आहेत.”
सामाजिक कार्यकर्त्या प्रोफेसर रुपरेखा वर्मा म्हणतात, “लखनऊ आधी असं नव्हतं. मात्र, गुंडगिरी वृत्तीच्या लोकांना ज्याप्रकारे ग्लोरिफाय केलं जातयं, त्यामुळे वातावरण बिघडत चाललयं. पोलीस तत्काळ पावलं उचलून कारवाई करतात पण नंतर काहीच होत नाही. त्यामुळे उपद्रवी लोकांची हिम्मत वाढली आहे.”
तर, सामाजिक कार्यकर्ते आणि माजी पोलीस अधिकारी एसआर दारापुरी म्हणातात, “अशा प्रकारच्या घटनांवरून आता पोलिसांचा दरारा राहिला नसल्याचं दिसून येतं. ही दुचाकीची घटना असो वा कावड यात्रेकरूंकडून लोकांनाच काय तर पोलिसांनाही मारहाण केल्याचा घटना असो. गोंधळ घालणारे किती निर्भय आहेत हे दिसून येतं.”
नॅशनल क्राइम रिकॉर्डस ब्युरो (एनसीआरबी) च्या आकडेवारीनुसार 2022 साली महिलांच्या प्रकरणात सुमारे 4 लाख 45 हजार गुन्हे दाखल झाले. म्हणजे, दर तासाला 51 एफआयआर नोंदवले गेले.
2021 मध्ये हा आकडा 428278 होता. एकूण प्रकरणांपैकी सुमारे 19 टक्के प्रकरणं विनयभंगाची तर सात टक्के बलात्काराची प्रकरणे होती.