बंगलेच नाहीत तर टॅक्स का भरला? सोमय्यांचा हल्लाबोल

बुधवार, 16 फेब्रुवारी 2022 (10:42 IST)
शिवसेना नेते संजय राऊत यांनी मुंबईत मंगळवारी शिवसेना भवनात पत्रकार परिषद घेत सोमय्यांवर गंभीर आरोप केले. आता या आरोपांना किरिट सोमय्यांनीही जोरदार प्रत्युत्तर दिलं आहे. 
 
पीएमसी बँक घोटाळा आणि सोमय्या कुटुंबाचा एक दमडीचाही संबंध नसून उद्धव ठाकरे सरकारने या आरोपाची चौकशी करावी, असे आव्हानही सोमय्यांनी दिले.
 
अलिबागमधील 19 बंगल्यांचा कर रश्मी ठाकरेंनी भरला. जर बंगलेच नाहीत तर मग कर का भरला? असा सवालही यावेळी किरीट सोमय्यांनी उपस्थित केला. ग्रामपंचायतीने दिलेले कागदपत्र किरीट सोमय्यांकडून सादर करण्यात आले. तसेच वनखात्याच्या जमिनीवर घरं बाधल्याचा किरीट सोमय्यांनी आरोप केला आहे. अलिबागमध्ये बंगले दिसले नाही तर जोड्याने मारू असे संजय राऊत बोलले पण हे मला बोलताय की रश्मी उद्धव ठाकरे यांना उद्देशून बोलताहेत, असा टोला सोमय्यांनी लगावला आहे. कारण तेथे 19 बंगले आहेत की नाही हे पाहण्यासाठी रश्मी ठाकरे, मनिषा वायकर यांना घेऊन जा, असेही ते म्हणाले.
 
किरीट सोमय्या यांनी दिल्लीत पत्रकार परिषद घेत संजय राऊतांवर पलटवार केला आहे. या दरम्यान त्यांनी विचारले की कोव्हिड घोटाळ्याबाबत संजय राऊत एक शब्दही का बोलले नाहीत? माझ्यावर कितीही गुन्हे दाखल केले तरी मी घाबरणार नाही. संजय राऊत यांचे घोटाळे बाहेर काढणारच असं आव्हान किरीट सोमय्यांनी दिलं आहे. 

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती