'रेशन दुकानांमध्ये नरेंद्र मोदींचा फोटो का नाही?', निर्मला सीतारामन चिडल्या

रविवार, 4 सप्टेंबर 2022 (10:12 IST)
केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारामन तेलंगणाच्या दौऱ्यावर असताना रेशनच्या दुकानांमध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्यावरून त्या संतापल्या.
 
लोकसभा प्रवास योजनेअंतर्गत त्यांनी तेंलगणाच्या कामारेड्डी जिल्ह्यातील बिरकु़र या गावी भेट दिली. त्याठिकाणी काही नागरिकांशी चर्चा करत असताना रेशनाच्या दुकानात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा फोटो नसल्याचं त्यांना आढळलं. यावरून त्यांनी अधिकाऱ्यांना विचारणा सुद्धा केली. 
 
त्या म्हणाल्या, "बाजारात 35 रुपये किलो असलेला तांदूळ तुम्हाला केंद्र सरकार 1 रुपयाने देते. 30 रुपये खर्च केंद्र सरकार उचलते तर केवळ 4 रुपये खर्च राज्य सरकार उचलते. तसंच कोरोना आरोग्य संकटात गरीब कल्याण आरोग्य योजनेअंतर्गत 5 किलो तांदूळ मोफत दिला जातो.
 
"तरीही तेलंगणाचे सरकार मात्र रेशन दुकानांमध्ये नरेंद्र मोदी यांचा फोटो लावत नाही. बॅनर्स लावले तर ते फाडण्यात येतात."
 
पंतप्रधानांचा फोटो दुकानात का नाही? असा प्रश्न विचारत निर्मला सीतारामन यांनी अधिकाऱ्यांना जाब विचारला. दरम्यान, अर्ध्या तासात पंतप्रधानांचा फोटो लावा असा आदेशही त्यांनी यावेळी दिला.
 
तेलंगणा सरकारने मात्र यावर टीका केलीय. आरोग्यमंत्री टी. हरीश राव यांनी हे हास्यास्पद असल्याचं म्हटलं आहे.

वेबदुनिया वर वाचा

संबंधित माहिती