शहरांमध्ये अतिवृष्टी आणि जागोजागी पाणी साचण्याचे प्रमाण का वाढत आहे?
मंगळवार, 13 सप्टेंबर 2022 (13:40 IST)
पुणे-मुंबईसह राज्यात ठिकठिकाणी पाऊस पडत आहे. यामुळे अनेक शहरातील जनजीवन विस्कळीत झाले आहे. आणि राज्यात अनेक ठिकाणी पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे.
पुण्यात तर 11 सप्टेंबरला दुपारी साधारणपणे 3.30 वाजल्यापासून अंधारुन आलं आणि थोड्याच वेळात मुसळधार पावसाला सुरुवात झाली.
पुढचे 2-3 तास जोरदार कोसळणाऱ्या पावसाने पुणे शहराला झोडपून काढलं. पुणे शहरात सोमवारी देखील पाऊस पडला आणि मंगळवारी सकाळी देखील पाऊस सुरूच होता.
हवामान विभागाने दिलेला माहितीनुसार एका तासातच पुण्यातल्या बहुतांश भागांमध्ये 50 मि.मी. पेक्षा जास्त पाऊस रविवारी पडला होता.
पण या पावसाचे दृश्य परिणाम शहरात लगेचंच दिसले. शहरात अनेक ठिकाणी रस्त्यांवर पाणी साचलं. अनेक हाऊसिंग सोसायटींमध्ये पाणी शिरलं होतं. कोथरुड भागात तर ग्राऊंड फ्लोअरवर असणाऱ्या फ्लॅटमध्ये पाणी शिरलं होतं.
शहराच्या विविध भागांमधून समोर आलेल्या व्हीडिओ मधून अवघ्या काही तासांच्या पावसाने शहर जलमय झाल्याचं चित्र पुढे आल्याचं दिसलं.
पुण्यात गेल्या 24 तासांत मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याची माहिती पुणे हवामान विभागाचे प्रमुख के. एस. होसाळीकर यांनी ट्विटरवर दिली.
विदर्भ आणि मराठवाड्यातही पावसाची शक्यता हवामान खात्याकडून वर्तवण्यात आली आहे.
पुणे, मुंबई, ठाणे, पालघर या ठिकाणी आज (13 सप्टेंबर) रोजी पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली आहे.
शहरात मोठ्या प्रमाणात पाणी साचल्यानंतर अग्निशमन दलाकडे तक्रारी आल्या. अशा तक्रारींची संख्या 25 होती तर झाडं पडण्याच्या 10 घटनांची नोंद एका दिवसात झाली.
काही तासांतच शहर जलमय का झालं?
पण काही तासांच्या पावसातच शहर जलमय का झालं हा प्रश्न आपल्या सर्वांना पडला आहे. हवामान बदलांचा अभ्यास करणाऱ्या तज्ञांकडून आम्ही जाणून घेतलं.
पुण्यातील इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरीओलॉजीतले वैज्ञानिक डॉ. रॉक्सी मॅथ्यू कॉल यांनी थोड्या वेळातच जास्त पाऊस पडण्याच्या वाढत्या ट्रेंडविषयी माहिती दिली.
"सर्वसाधारणपणे तापमानातील प्रत्येक 1 अंश सेल्सिअसची वाढ ही पर्जन्यमानातील 7-10 % वाढीशी संबंधित आहे. याचे कारण असे की, जसजशी हवा गरम होत जाते तसतसे ती अधिक आर्द्रता जास्त काळ धरुन ठेऊ शकते. पावसाच्या प्रमाणातील ही वाढत्या हंगामात सारख्या प्रमाणात वितरित होत नाही.
"हवेची आर्द्रता धरुन ठेवण्याची क्षमता वाढण्याचा परिणाम पाऊस पडण्याच्या पॅटर्नवर होतो. याचा परिणाम म्हणून बऱ्याच काळ पाऊस पडत नाही. अधूनमधून कमी वेळातच जोरात मुसळधार पावसाच्या सरी कोसळतात," कॉल सांगतात.
"काही प्रदेशांमध्ये मुसळधार पाऊस आणि दरडी कोसळण्याच्या घटनांमध्ये सातत्याने वाढ होत असल्याचे दिसून येत आहे. तर शहरी भागात अचानक पूर येताना दिसत आहेत. तसेच जागोजागी पाणी साचण्याची उदाहरणं दिसत आहे. शहरीकरणामुळे याची दाहकता वाढते कारण पाणी जिरण्यासाठी मोकळ्या जागा राहत नाहीत आणि ड्रेनेज भरलेले असतात," डॉ. कॉल यांनी सांगितलं.
यामुळे भारतातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे पूर येण्याच्या प्रमाणात वाढ झाल्याचं निरिक्षणही तज्ज्ञांनी नोंदवलं.
महाराष्ट्राबाहेरही वाढत आहे अतिवृष्टीचे प्रमाण
कॉल पुढे सांगतात, "भारतातल्या अनेक भागांमध्ये अतिवृष्टीमुळे मोठ्या प्रमाणात पूर येण्याच्या घटांमध्ये तिपटीने वाढ झालीये.
"अतिवृष्टीचा हा वाढता ट्रेंड मध्य आणि उत्तर भारतात आढळून येतोय. गुजरात, महाराष्ट्र, मध्य प्रदेश, छत्तीसगड, तेलंगणा, ओडिशा, झारखंड, आसाम आणि पश्चिम घाटाचा काही भाग, गोवा, उत्तर कर्नाटक आणि मध्य केरळमध्ये हा ट्रेंड दिसून येतोय. सततच्या उत्सर्जनामुळे, या भागातील मुसळधार पाऊस आणखी वाढण्याची शक्यता आहे," असं डॉ. कॉल यांनी सांगितलं.
पुण्यात रविवारी आलेल्या पावसाने 2019 साली पुणे शहरात आंबिल ओढ्याला आलेल्या पुराची आठवणी जागा झाल्या.
याविषयी बोलताना सेंटर फॉर सिटिजन्स सायन्सचे सेक्रेटरी मयुरेश प्रभुणे म्हणाले की, "रविवारी शहराच्या वेगवेगळ्या भागांत एकाच प्रमाणात पाऊस पडला नाही. काही ठिकाणी 90 मि.मी. तर काही ठिकाणी 50-60 मि.मी एवढा पाऊस पडला. सेंटर फॉर सिटीजन्स सायन्समार्फत 'सतर्क' हा उपक्रम राबवला जातो."
"आम्ही जे पाहतोय ते 2019 पासून ते आतापर्यंत अशा घटना वाढल्या आहेत. या पुर्वी असा मोठा पूर येण्याची फ्रेक्वेन्सी जी 7-8 वर्षांवर होती ती आता 2-3 वर्षांवर आली आहे. 2019 च्या आधी तसा पाऊस 2010 मध्ये झाला होता. तेव्हा एनसीएल मधले एक वैज्ञानिक त्यात वाहून गेले होते. तो ऑक्टोबर पाऊस झाला होता.
"त्यानंतर 2019 साली सप्टेंबर मध्ये आपण तसा पाऊस पाहिला. तेव्हा आंबिल ओढ्याला पूर आला होता. आता असं झालंय की शहराच्या सगळ्याच भागांमध्ये पण लोकलाइज्ड पद्धतीने पाऊस झाला. सगळ्याच ठिकाणी सारख्या प्रमाणात पाऊस पडला नाही. काही ठिकाणी 90 मि. मी. पाऊस झाला पण तिथून पाच- सहा किलोमिटर अंतरावर 50-60 मि. मी पाऊस झाला. तेव्हा 'क्लाउड फाॅरमेशन' सुरू होतं. वेगवेगळ्या उंच ढग तयार झाले आणि तेवढा पाऊस झाला. त्यांची उंची ही 12-15 किलोमिटर पर्यंत जात होती," मयुरेश प्रभुणेंनी माहिती दिली.
शहरांची पुनर्रचना होणं का आवश्यक आहे?
वेगवेगळ्या प्रमाणात पाऊस होऊनही पुणे शहर जलमय का झालं? याविषयी बोलताना मयुरेश प्रभुणेंनी सांगितलं की, "पुण्यातल्या पावसाचे जे व्हीडिओ जे आलेत त्यावरुन एक गोष्ट लक्षात घेतली पाहीजे की, पावसाचे आकडे फार मोठे नाहीयेत.
96.5 मि. मी हा सगळ्यांत मोठा आकडा आहे. बाकी 50-60 मि. मी च्या दरम्यान आहेत. पण तरही अशी परिस्थिती तयार झाली. यावरुन पाणी वाहून जाण्याच्या जागा बंद झालेल्या आहेत हो दिसून येतं.
यामध्ये रस्ते बांधकाम हा मोठा भाग आहे. ते करताना पाणी वाहून जाण्यासाठी आवश्यक असलेल्या गोष्टी करण्याची दक्षता आपण घेतलेली नाहीये हे दिसून येतं."
तज्ज्ञांच्या मते थोड्या वेळात भरपूर होणारा पाऊस आणि अचानक येणारे पूर याला तोंड देऊ शकतील याप्रकारे शहरांची रचना होणं आवश्यक आहे.
"भारतातील शहरं असे अचानक येण्याऱ्या पुरांना बळी पडण्याची शक्यता जास्त आहे. वेगाने होणारा विकास, काँक्रिटीकरण आणि जमिनीच्या वापरात होणारे बदल यामुळे ड्रेनेज, मोकळ्या जागा आकुंचित होत जातात. नद्या आणि नाले आकुंचतात.
"आपल्याला आपल्या शहरांची अशी पुनर्रचना करण्याची गरज आहे की ते पुरपरिस्थितीचा सामना करू शकतील," असं डॉ. रॉक्सी मॅथ्यू कोल वैज्ञानिक इंडियन इंस्टिट्यूट ऑफ ट्रॉपिकल मेटेरीओलॉजी पुणे यांनी सांगितलं.